गोंदिया : ज्येष्ठ नागरिकांना गावात सन्मानाचे स्थान मिळावे यासाठी शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेच्या बक्षीस विनियोगात जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्याचे प्रावधान केले आहे. यामुळे गोंदिया जिल्ह्यातील तंटामुक्त गावात दोन हजारापेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार झाला आहे. महाराष्ट्र शासनाने गावाला शांततेकडून समृध्दीकडे नेण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम अमलात आली. या मोहिमेंंतर्गत गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून गावाला विकासाच्या वाटेवर नेणारे उपक्रम समित्यांनी राबविले. गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडवून गावातील ज्येष्ठ नागरिकाला आपल्या समस्या समाजापुढे मांडता याव्यात यासाठी ज्येष्ठ नागरिकांना तंटामुक्त गाव मोहिमेच्या बक्षीस नियोजन कार्यक्रमात बोलावण्यात येत आहे. आजच्या स्थितीत संयुक्त कुटुंब पध्दती कालबाह्य ठरली आहे. मी, माझी पत्नी व माझी मुले यातच समाधान मानून आई-वडिलांना दुरावणारी मुले आजही समाजात आहेत. या मुलांना आपल्या आई-वडिलांप्रती आपुलकी वाटावी यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने पुढाकार घेतला आहे.एक समिती कमीत कमी गावातील पाच ते सहा ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करून त्यांचा सन्मान राखण्यासाठी पावले उचलत आहेत. तंटामुक्तीमुळे वाळीत टाकल्या जाणाऱ्या वृध्दांचा सन्मान झाल्याने ज्येष्ठ नागरिकांचा प्रति गावकऱ्यांचीच नाही तर त्यांचा मुलांमध्येही सन्मानजनक भावना निर्माण करण्यात ही मोहीम यशस्वी राहीली आहे. जिल्ह्यात सन २००७-०८ मध्ये ५६ गावे, सन २००८-०९ मध्ये २६२ गावे, २००९-१० मध्ये २०५ गावे तर उर्वरीत ३३ गावे सन २०१०-११ मध्ये पात्र झाली. या गावांना बक्षिसापोटी लाखो रुपये प्रत्येक गावाला देण्यात आले. यामुळे तंटामुक्त समित्यांनी गावात समाज प्रबोधन करून ज्येष्ठ नागरिकांची गरिमा राखण्यात मोलाची मदत केली आहे. आजघडीला संयुक्त कुटुंब पध्दती कालबाह्य ठरल्याने ज्येष्ठांच्या समस्या वाढल्या आहेत. महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने जेष्ठ नागरिकांना सन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. गोंदिया जिल्ह्यातील तंटामुक्त होणारी ५५६ गावे ज्येष्ठांचा सन्मान राखण्यासाठी सरसावली आहे. भविष्यात जेष्ठांच्या समस्या वाढणार असल्याचे पाहून समिती त्या दृष्टीने पाऊल टाकत आहे. (तालुका प्रतिनिधी)
तंटामुक्तीमुळे दोन हजार ज्येष्ठ नागरिक झाले सन्मानित
By admin | Updated: October 25, 2014 22:43 IST