विद्यार्थिनी मृत्यू प्रकरण : संस्थाचालक व प्रकल्प अधिकाऱ्याचे कटकारस्थानशेंडा-कोयलारी : श्रीकृष्ण अवधूत आदिवासी आश्रम शाळा कोकणा-जमी. येथील वर्ग १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीचा मृत्यु होऊन पाच महिन्यांचा कालखंड लोटला. तरीही तिच्या कुटुंबीयांना आजपावेतो न्याय मिळाला नाही. संस्थाचालक व प्रकल्प अधिकारी यांच्या कटकारस्थानामुळेच मृतक विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना न्याय मिळू शकला नाही, असा आरोप आदिवासी संघटनांनी केला आहे. सविस्तर वृत्त असे की, श्रीकृष्ण अवधूत आदिवासी आश्रम शाळा कोकणा-जमी येथे वर्ग बारावीच्या विज्ञान शाखेत शिकणारी किरण लक्ष्मण सलामे (१७) या विद्यार्थिनीचा १९ मार्च रोजी शाळा व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला. याची माहिती संस्थाचालक व प्रकल्प अधिकारी यांना देण्यात आली होती. प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून संस्थाचालक व प्रकल्प अधिकारी, देवरी यांनी संगनमत करून चौकशी करताना दिरंगाई केली. शासन निर्णयानुसार, प्रथमत: मृत्यू पावलेल्या विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान म्हणून सात हजार ५०० रूपये तात्काळ देणे गरजेचे होते. परंतु संस्था चालकांच्या दबंगगिरीमुळे प्रकल्प अधिकारी नतमस्तक होऊन सदर प्रकरण नियमात बसत नाही, असे सांगून स्वत:ला सावरल्याचे प्रयत्न करण्यात आले. वास्तविक पाहता या संस्थेचे संस्थाचालक व पदाधिकारी भाजपाचे आहेत. तसेच गोंदिया व भंडारा जिल्ह्यात भाजपाचेच आमदार व खासदार असल्याने त्यांच्या माध्यमातून संस्था चालकांनी प्रकल्प अधिकाऱ्यांवर दबाव तंत्राचा वापर केला, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या विद्यार्थिनीच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे. मृतक विद्यार्थिनी किरण सलामे हिच्या कुटुंबीयांना त्वरित न्याय मिळाला नाही तर ७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मोर्च्यात सदर प्रकरण प्रामुख्याने घेण्यात येईल. तसेच दोषींना सोडणार नाही, असा कडक इशारा आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. (वार्ताहर)पैशाच्या भरवशावर प्रकरणाला वेगळीच कलाटणीगोंदिया व भंडारा जिल्ह्यात अनेक अनुदानित आश्रम शाळा आहेत. परंतु त्या शाळांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आश्रम शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. संस्थाचालक मिळणाऱ्या अनुदानाच्या रकमेपोटी मातंबर झाले आहेत. अशातच एखादी घटना घडली तरी ते पैशाच्या भरवशावर प्रकरणाला वेगळीच कलाटणी देण्याचा प्रयत्न करतात. असाच प्रकार कोकणा-जमी येथील अवधूत आश्रम शाळेचा आहे.
आदिवासी कुटुंब न्यायापासून वंचित
By admin | Updated: August 14, 2015 02:05 IST