तिरोडा : होळी सणाच्या वेळी शांतता व सुव्यवस्था राहावी, याकरिता तिरोडा पोलिसांचा दररोज विशेष अभियान सुरु केले आहे. त्यानुसार २६ मार्च रोजी तिरोडा पोलिसांनी तीन ठिकाणी धाडी टाकून एक लाखावरील माल जप्त केला आहे. आरोपी छाया सोविंदा बरयेकर रा. सिल्ली हिच्या घरी सुरू असलेली मोहफुलाची भट्टी उध्वस्त केली. त्यात २० प्लास्टिक पोतडीत ४०० किलो मोहफुल किंमत ३२ हजार, एक ड्रम, घमेला व इतर साहित्य असा एकूण ३६ हजार ५५० रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. आरोपी संजय सोविंदा बरेकर रा. सिल्ली यांच्या घरातून २५ प्लास्टिक पोतडी ५०० किलो मोहाफुल किंमत ४० हजाराचा माल जप्त केला. बिरसीनाला येथील अमित अभिमन बरेकर, कमलेश महेंद्र शहारे व नरेश रामू वैद्य रा. महात्मा फुले तिरोडा हे मोहाफुलापासून दारू गाळत असतांना त्याच्या जवळून ४९ लिटर मोहाफुलाची दारू किंमत ४ हजार, २२ प्लास्टिक पोतडीत २२० किलो मोहाफुल किंमत १७ हजार ६०० रुपये असा २३ हजार ८५० रूपये असा एकूण १ लाख ४ हजाराचा माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश पारधी, पोलीस उपनिरीक्षक केंद्रे, पोलीस शिपाई अंबुले, उके, बिसेन, चालक पोलीस शिपाई शेख, महिला नायक पोलीस शिपाई मडावी, महिला पोलीस शिपाई भुमेश्वरी तिरेले यांनी केली.
होळीच्या पार्श्वभूमीवर तिरोडा पोलिसांच्या तीन ठिकाणी धाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:30 IST