परसवाडा : तिरोडा तालुक्याला लागूनच मध्य प्रदेशाचा बालाघाट जिल्हा असून, खैरी गावातून मातीच्या लाल विटांची अवैध विनापरवाना वाहतूक बाराही महिने महसूल, पोलीस विभागाच्या आशीर्वादाने सुरू असल्याचा आरोप आहे. यावर्षी पंतप्रधान योजनेंतर्गत घरकुल मोठ्या प्रमाणात मंजूर झाले असून, विटांची मागणी वाढल्याने मध्य प्रदेशातून दररोज मोठ्या प्रमाणात विटा येत असल्याने तिरोडा तालुक्यातील वीट व्यावसायिक अडचणीत आले आहेत.
बोंडरानी अर्जुनी नाक्यावरून दररोज २५ ट्रॅक्टर विनापरवाना विटांची वाहतूक होत असते. यात तलाठी, तहसीलदार, पोलीस यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आराेप आहे. मध्य प्रदेश येथील वीट व्यावसायिकांना मुभा देण्यात येत आहे. आठ ते नऊ हजार रुपये प्रतिट्रॅक्टर विटा घरकुल लाभार्थींना देण्यात येत आहे. तालुक्यातील वीट व्यावसायिकांना परवाना देण्यासाठी महसूल विभागाकडून टाळाटाळ केली जाते. मात्र मध्य प्रदेशातील व्यावसायिकांना सूट दिली जात असल्याचा आरोप आहे. प्रत्येक ट्रॅक्टरधारकाकडून पाच ते सात हजार रुपये वसुली केली जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.