नवेगाव-नागझिरा : रस्ते दुरूस्ती सुरू, भ्रमंती व पर्यटक निवासांची सोयगोंदिया : गेल्या १५ जूनपासून पर्यटकांसाठी बंद असलेला नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प येत्या २ आॅक्टोबरपासून पर्यटनासाठी खुला करण्यात येणार आहे. १ आॅक्टोबर रोजी गुरूवार असल्यामुळे तो दिवस वनभ्रमंती बंद राहते, मात्र शुक्रवारी २ आॅक्टोबरपासून पर्यटकांना सदर व्याघ्र प्रकल्पात पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र हे महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग मुंबई यांच्या अधिसूचनेने १२ डिसेंबर २०१३ पासून नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र म्हणून महाराष्ट्रातील पाचवे व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आले. त्यात नागझिरा, न्यू नागझिरा, नवेगाव व कोका अभयारण्य असे एकूण चार अभयारण्य व एक नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान मिळून ६५६.३६ चौ.किमी क्षेत्रात व्यापलेला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस संपत आले आहेत. मात्र पावसामुळे या व्याघ्र प्रकल्पातील काही रस्ते खराब झाले होते. त्यामुळे सध्या येथील रस्ते दुरूस्तीचे कार्य जोमात सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तसेच निसर्ग पर्यटनाचे स्थळ असल्यामुळे निसर्ग पर्यटनाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे जे गाईड लाईन्स दिलेले आहेत त्यानुसार कार्य सुरू आहे.या व्याघ्र प्रकल्पात सुष्क पानझडीचे जंगल असून वनाची घनता ०.५ ते ०.७ अशी आहे. जैवविविधतेच्या बाबत नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात साग, येन, बीजा, साजा, तिवस, मोहा, हलदू, अर्जुन, धावडा, बेहडा, जांभूळ, कऱ्हु, सालई, तेंदू, सेमल, जारूळ, चारोळी, आवळा, उंबर, हर्रा आदी प्रमुख व इतर ३६४ प्रकारच्या प्रजाती आढळून येतात. तसेच वाघ, बिबट, अस्वल, रानकुत्रे, गवे, सांबर, चितळ, निलगाय, वानर, चांदी अस्वल, रान डुक्कर, रान मांजर, चौसिंगा, तडस, कोल्हा, वटवाघूळ, खवल्या मांजर, माऊस डियर इत्यादी सस्तन व इतर ७२ प्रजातींच्या प्राण्यांचे अधिवास आहे. तसेच येथील प्रमुख पक्षांमध्ये मत्स्य गरूड, सर्प गरूड, शिकरा, बेसरा, हळद्या, धनेश, टकाचोर, कोतवाल, पोपट, पिट्टा, रान सातभाई इत्यादी व इतर ३१२ प्रजातींचा समावेश आहे. पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी नवेगावबांध, नागझिरा अभयारण्य, पिटेझरी प्रवेशद्वार व उमरझरी प्रवेशद्वार येथे निवासांची सोयसुद्धा उपलब्ध आहे. एकूणच पर्यटकांना पर्यटनाचा भरपूर आनंद घेण्यासाठी २ आॅक्टोबरपासून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प सज्ज झालेला आहे. (प्रतिनिधी)
व्याघ्र प्रकल्प २ पासून होणार पर्यटनासाठी सज्ज
By admin | Updated: September 25, 2015 02:19 IST