गोंदिया : शहरातील पथदिवे रात्री सुरू राहण्याऐवजी आवश्यकता नसताना दिवसाच्या सूर्यप्रकाशात सुरू राहात आहेत. दिवसा पथदिवे सुरु असल्याची तक्रार नागरिकांनी पालिकेच्या कर्मचार्यांकडे केल्यानंतर ते आपली जबाबदारी झटकून वीज वितरण कंपनीकडे बोट दाखवत आहेत. तर वीज वितरण कंपनी पालिकेकडे बोट दाखवत आहे. दोघेही आपली जबाबदारी स्किारण्यास तयार नसल्याने दोघांच्या झगड्यात गोंदिया शहर मात्र दिवसाही विजेच्या उजेडात उजळून निघत आहे. शहरात एकूण ४० वॉर्ड असून या शहराला रस्ते, वीज, पाणी या सर्व पायाभूत सुविधा पुरवठा करण्याची जबाबदारी नगर परिषदेची आहे. रात्रीच्या वेळेस ये-जा करताना नागरिकांना त्रास होऊ नये याकरिता नगर परिषदेच्या वतीने प्रत्येक भागात विद्युत पथदिवे लावण्यात आले आहेत. नागरिकांना या पायाभूत सुविधा देताना नगर परिषद यासाठी दिवाबत्ती, पाणी, शिक्षण, वृक्षकर, मालमत्ताकर अशा विविध करांची आकारणी करीत असते. या माध्यमातून गोळा झालेल्या रक्कमेतूनच हा सर्व खर्च केला जातो. शहरातील विविध रस्ते व वॉर्डात विद्युत पथदिवे लावण्यात आले आहेत. हे पथदिवे रात्रीच्या वेळेस सुरु करण्याची व सकाळी बंद करण्याची जबाबदारी नगर परिषदेच्या विद्युत विभागाची आहे. मात्र हा विभाग आपली जबाबदारीच विसरला असल्याने व या विभागाला आपल्या चुकांवर पांघरुन घालून दुसरीकडे बोट दाखविण्याची सवय लागली आहे. यामुळेच मागील काही दिवसांपासून शहरातील मनोहर चौक, काका चौक, सिव्हील लाईन, छोटा गोंदिया, खोजा मस्जीद, इंदिरा गांधी स्टेडियम, उड्डाणपुल, गोरेलाल चौक या भागातील विद्युत पथदिवे रात्री बंद राहतात, तर दिवसाच्या वेळेस सुरु राहतात. हा प्रकार गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. याबाबत शहरातील काही सुज्ञ नागरिकांनी नगर परिषदेच्या विद्युत विभागाकडे तक्रार देखील केली. मात्र याचा काहीही उपयोग नगर परिषदेच्या कार्यप्रणालीवर झाला नाही. आधीच गोंदिया नगर परिषदेचा गाडा तोट्यात सुरु असतांना पालिका कर्मचार्यांच्या निष्काळजीपणामुळे अजून फटका बसत आहे. दिवसभर पथदिवे सुरु राहत असल्याने महिण्याकाठी विद्युत बिलात वाढ होत असल्याने हजारो रुपयांचा अतिरिक्त भरणा नगर परिषदेला करावा लागत आहे. बर्याच भागातील विद्युत पथदिवे बंद आहेत मात्र हे बंद पथदिवे सुरु करण्याचे सौजन्य आजवर पालिकेने दाखविलेले नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांची मोठी गोची होत आहे. एकीकडे शहरातील पथदिवे दिवसा सुरु ठेऊन रात्रीच्या वेळेस बंद ठेवण्यात पालिका प्रशासन धन्यता मानत आहे. यामुळे शहरात दिवसा उजेड व पालिकेच्या आशिर्वादाने रात्री अंधार अशीच स्थिती निर्माण झाली आहे.गोंदिया नगरपरिषदेने याकडे लक्ष देण्याची मागणी शहरवासीयांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
पालिकेला महिन्याकाठी हजारो रुपयांचा फटका
By admin | Updated: May 19, 2014 23:37 IST