केशोरी : अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील केशोरी हे गाव त्या परिसरातील सर्वात मोठे गाव असून या ठिकाणी १९६० पासून प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु आहे. या ठिकाणी रुग्णांची वाढलेली संख्या व तालुक्यापासूनचे अंतर लक्षात घेऊन केशोरी परिसरातील जनतेने ग्रामीण रुग्णालयाची मागणी केली होती. परंतु राजकिय इच्छाशक्तीच्या अभावामुळे येथील ग्रामीण रुग्णालय निर्मितीची मागणी हवेतच विरली असल्याचे दिसून येत आहे.केशोरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील ओपीडी मध्ये दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असून वर्षामध्ये चाळीस-पन्नास हजारच्या आसपास रुग्णांची संख्या जात आहे. या ठिकाणी सुसज्ज इमारत, स्वच्छ परिसर, सर्व सोई सुविधा, संरक्षण भींत, आकर्षक प्रवेशद्वार इत्यादी गोष्टी ग्रामीण रुग्णालय निर्मितीसाठी आवश्यक असून त्या परिपुर्ण व्यवस्था येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध असताना येथे ग्रामीण रुग्णालय निर्मितीचा प्रश्न मार्गी का लागत नाही असा पश्न पडतो. हे एक प्रकारचे न उलगडणारे कोडेच समजावे लागेल. ज्या वेळेस इळदा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूरीची घोषणा झाली. तेव्हाच केशोरी येथे ग्रामीण रुग्णालय निर्मितीची घोषणा होणे अपेक्षित होते. परंतु माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक. मात्र केशोरीला ग्रामीण रुग्णालय मंजुरीची घोषणा होऊ शकली नाही.
ग्रामीण रुग्णालयाची मागणी हवेतच विरली
By admin | Updated: August 9, 2014 23:48 IST