अमरचंद ठवरे - बोंडगावदेवीअनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्रात आज तरी राजकीय चित्र धुसरच दिसत आहे. मतदारही मौन पाळून उमेदवारांच्या प्रचाराचा आनंद लुटताना दिसत आहे. यावेळी पहिल्या प्रथमच सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्याने निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्यात बहुरंगी लढतीचे चित्र आता स्पष्ट झालेले दिसत आहे. रिंगणातील अपक्ष उमेदवारांनी प्रचारात कमालीची आघाडी घेतल्याने कधीकाळी कोणाचे परंपरागत असलेली मते विभागले जाणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.अर्जुनी/मोरगाव, सडक/अर्जुनी तसेच गोरेगाव तालुक्यात विखुरलेल्या अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्रात १३ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. भाजपाचे राजकुमार बडोले, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजेश नंदागवळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर चंद्रिकापुरे, बसपाचे डॉ. भीमराव मेश्राम, शिवसेनेचे किरण कांबळे, भारिप बहुजन महासंघाचे धनपाल रामटेके यांच्यासह अपक्ष म्हणून अजय लांजेवार, प्रमोद गजभिये, रत्नदीप दहिवले, दिलवर रामटेके, दिलीपकुमार वालदे यांनीसुध्दा प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसत आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव मतदार संघ असल्याने राजकीय पक्षाचे स्थानिक नेते मात्र प्रचारापासून अलिप्त राहण्यातच धन्यता मानताना दिसत आहेत. भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांच्या उमेदवारांना मतविभाजनाचा फटका बसणार असल्याचे चित्र दिसत आहे. सदर मतदार संघात दलितांचे ५० हजारांच्यावर मतदार आहेत. परंतु दलित समाज कोण्या एका नेत्याच्या पाठीमागे नाही, अशी विदारक स्थिती आहे. बसपाचे काही कॅडर मतदार आहेत. मागील निवडणुकीत बसपाचे करमचंद शहारे यांना सहा हजाराच्यावर मते मिळाली होती. यावेळी बसपाचा उमेदवार आर्थिक संपन्नतेचा असल्याने दलित मतदारांना काही प्रमाणात आपल्याकडे ओढण्याचा निश्चितच प्रयत्न करणार, अशी चर्चा मतदार रंगवू लागले आहेत. उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात काँग्रेस वर्तुळात रुसवे-फुगवे झाले. त्याचे पर्यवसान बंडखोरीत झाले. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार राजेश नंदागवळी यांना पक्षातील दोन बंडखोर उमेदवारांचा सामना करावा लागत आहे. त्या दोन उमेदवारांच्या उमेदवारीने काँग्रेसच्या व्होट बँकेला तीळमात्र छेद दिल्या जाणार नाही, अशी परिस्थती काँग्रेस वर्तुळात निर्माण झालेली दिसत आहे. त्यांच्या हायटेक प्रचाराने दलितांच्या मतावरच त्यांची मदार असल्याचे दिसते. भाजपाचे विद्यमान आ. राजकुमार बडोले यांना पक्षांतर्गत विरोध सहन करावा लागत आहे. भाजपाचे तालुक्यातील नेते शरीराने त्यांच्या सोबत असले तरी मात्र कलाकारी वेगळी करण्याची रणनीती त्यांच्या माशी बसण्यची भीती भाजपचे पदाधिकारी व्यक्त करीत आहेत. भाजपातून बंडखोरी करून शिवसेनेच्या धनुष्यबाणावर आरूढ झालेल्या किरण कांबळे यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली. कार्यकर्त्यांचा मोठा लवाजमा त्यांच्या पाठीमागे आहे. भाजपातील असंतुष्ट पदाधिकारी, कार्यकर्ते धनुष्यबाणाची कमान सांभाळताना दिसत आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झालेले मनोहर चंद्रिकापुरे राष्ट्रवादीचे उमेदवार रणांगणात आहेत. त्यांंना खा. प्रफुल्ल पटेल यांचा पूर्ण पाठिंबा आहे. त्यांच्या प्रचारासाठी पटेलांनी कार्यकर्त्यांना ताकीद दिली. कृषी अधिकारी असल्याने मतदार संघातील शेतकऱ्यांशी त्यांचे जवळीक संबध आले. विविध पक्षातील शेतकरी आज तरी त्यांच्या बाजुने दिसत आहेत. भारिप बहुजन महासंघाचासुध्दा मतदार संघात प्रभाव आहे. बाळासाहेबांचे चाहते असल्याने धनपाल रामटेके यांना बळ प्राप्त झाले आहे. दिलीपकुमार वालदे अपक्ष असले तरी पोटजातीनुसार त्यांच्या वाटेला दलितांची मते जाणार, यात शंका नाही. सहा राजकीय पक्षांसह सात अपक्ष उमेदवारांमध्ये मत विभागणी होणार आहे. दलितांची एकगठ्ठा मते कोणाच्या एका दावणीला बांधले जाणार नाहीत. भाजपा-काँग्रेस यांच्या मतविभागणीचा फायदा कोणाच्या माथी पडतो, हे येणारा काळच सांगेल. एकंदरीत बहुरंगी लढतीने भविष्यवेत्यांची गरज पडणार नाही. मतदारच ईव्हीएम मशीनव्दारे आपला हुकूमी एक्का चालवून आश्चर्य करणारा निकाल देतील, असे दिसते.
अर्जुनी/मोरगाव क्षेत्रात बहुरंगी लढतीने चुरस वाढली
By admin | Updated: October 11, 2014 23:09 IST