तिरोडा शहराला लागून असलेल्या ग्राम चिरेखनी येथील सुनील पोतन बागडे यांच्या घरी एक मोठा बोकड होता. तीन दिवसांपूर्वीच बोकड खरेदी करण्यासाठी काही लोक आले होते. त्यांनी १० हजार रुपयांत बोकडाची मागणी केली होती. मात्र, सुनील बागडे यांनी बोकड विकण्यास नकार दिला होता. तर दुसरा बोकड चिरेखनी येथीलच गुलाब पारधी यांचा असून त्याची मागणीसुद्धा आठ हजार रुपयांत खरेदीदारांनी केली होती. मात्र, त्यांनी सुद्धा विक्री करण्यास नकार दिला होता. मारबत असल्याने रात्री १२ वाजेपर्यंत चिरेखनी गावात पोलिसांची गस्त सुरू होती. बिट अंमलदार नीलकंठ रक्षे स्वतः आपल्या पोलीस सहकाऱ्यांसह चिरेखनी गावात रात्री १२ वाजेपर्यंत पेट्रोलिंग करीत असल्याचे त्यांनी सांगितले. रात्री १२ वाजेनंतर पोलीस परत जाताच चोरट्यांनी डाव साधला. सुनील बागडे व गुलाब पारधी यांच्या घरातील छपरीत असलेल्या दोन्ही बोकडांची चोरी केली. चोरी करण्यात आलेल्या बोकडांची किंमत १८ हजार रुपये सांगितली जाते.
मारबतच्या पूर्वसंध्येला दोन बोकडांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:34 IST