लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : राज्य शासनाने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना सुरू केली व आतापर्यंत या योजनेत पात्र ठरलेल्या सर्वच लाभार्थीना लाभ दिला. मात्र, आता या योजनेतील पात्र लाभार्थीची पडताळणी केली जाणार असल्याचे राज्य शासनाने जाहीर केले असून, अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या व चारचाकी वाहन असलेल्या महिलांना यातून वगळले जाणार आहे.
राज्य शासनाचे हे फर्मान ऐकून मात्र चारचाकी असलेल्या लाडक्या बहिणींची धडकी वाढली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत राज्य शासनाने विधानसभा निवडणुकीपूर्वी पाच टप्प्यांतील अर्थसाहाय्य महिलांच्या बँक खात्यात जमा केले होते. सहावा टप्पा विधानसभा निवडणूक संपताच विशेष अधिवेशनानंतर जमा करण्यात आला होता. लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक अपात्र महिलांनीही घेतलेला आहे, ही बाब शासनाच्या हळूहळू लक्षात येत आहे. त्यामुळे शासन आता प्राप्तिकर विभाग (इन्कम टॅक्स), परिवहन विभाग आदी विभागांची मदत घेऊन छाननी करणार आहे. यात कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांवर तसेच कुटुंबात चारचाकी वाहन असलेल्या महिलांना योजनेतून बाद केले जाणार आहे. याबाबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सूतोवाच केलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक लाडक्या बहिणींमध्ये अपात्र होण्याबाबत धास्ती निर्माण झालेली आहे.
ट्रॅक्टर असल्यास काय? ग्रामीणसह शहरी कुटुंबात अनेकांकडे ट्रॅक्टर आहेत. हे ट्रॅक्टर कृषक प्रकारातील आहेत की व्यावसायिक प्रकारातील, यावरून लाभार्थी ठरविले जाणार आहेत. ट्रॅक्टर जर कृषक प्रकारातील असेल तर त्या कुटुंबातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देय राहील. व्यावसायिक प्रकारातील ट्रॅक्टर असल्यास लाभ दिला जाणार नाही. हे योजनेच्या पहिल्याच शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलेले आहे.
३,६१,२१६ लाडक्या बहिणी जिल्ह्यात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचे सुमारे तीन लाख ६१ हजार २१६ लाभार्थी आहेत; तर एक हजार ५६१ अर्ज नामंजूर झाले. जिल्ह्यात जवळपास अडीच लाखांवर महिलांना या योजनेचे सहा हप्ते मिळालेले आहेत.