काँग्रेसचे आंदोलन : जि.प. अध्यक्षांसह अग्रवाल, राऊत यांचा सहभाग गोंदिया : पंतप्रधान मोदी गेल्या ८ नोव्हेंबरला लागू केलेल्या नोटाबंदीने सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या निर्णयाचा निषेध करण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी येथील जयस्तंभ चौकात थाळीनाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार गोपालदास अग्रवाल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषाताई मेंढे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात माजी आमदार रामरतन राऊत, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरूषोत्तम (बाबा) कटरे, महासचिव अमर वराडे, जि.प.सभापती पी.जी.कटरे, महिला काँग्रेस अध्यक्ष उषा शहारे, सहेषराम कोरोटे, अशोक चौधरी व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोदींनी ५० दिवसानंतर नोटाबंदीचे चांगले परिणाम दिसतील असे म्हटले होते. परंतू प्रत्यक्षात ६० दिवसानंतरही लोकांना बँकांसमोर रांगा लावाव्या लागत आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचा भाव मिळेनासा झाला आहे. आजारी लोकांना इलाज करणेही कठीण झाले आहे, असे आरोप करीत यावेळी काँग्रेसच्या वतीने घंटानाद करण्यात आला. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)
नोटाबंदीविरोधात थाळीनाद
By admin | Updated: January 12, 2017 00:16 IST