अर्जुनी मोरगाव : अर्जुनी ते सानगडी मार्गावरील बोंडगावदेवीजवळ एका मिनी ट्रकने मोटारसायकल स्वारास धडक दिल्याने युवक ठार झाल्याची घटना शुक्रवारी (दि.२५) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली. सुमेध जयदेव रामटेके (वय २७) रा. बोंडगावदेवी असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार शुक्रवारी सुमेध रामटेके हा त्याच्या मोटारसायकल क्रमांक एमएच ३५ एपी ४८५३ ने अर्जुनी मोरगाव येथे गेला होता. सायंकाळी तो गावाला परत येत होता. दरम्यान बोंडगावदेवीजवळ मिनी ट्रक क्रमांक एमएच ३१, एम ८०६३ ने त्याच्या मोटारसायकल जोरदार धडक दिली. यात सुमेध गंभीर जखमी झाला. तो जखमी अवस्थेत रस्त्यावरच पडून होता. या मार्गावरुन जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात येताच १०८ क्रमांकावरून रुग्णवाहिकेला पाचारण केले. यानंतर जखमी सुमेधवर स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल करुन प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला गोंदिया येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले. पण गोंदियाला आणत असतानाच सुमेधचा वाटेतच मृत्यू झाला. याप्रकरणी अर्जुनी मोरगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला मिनी ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले आहे.