ंगोंदिया : गोंदिया जिल्हा परिषदेंतर्गत असलेल्या शिक्षक व शिक्षण सेवकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यावर अद्याप तोडगा निघाला नाही. आपल्या समस्या निकाली काढण्यासाठी आक्रमक पवित्रा घेत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा पदाधिकार्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकार्यांशी चर्चा केली. आमच्या समस्या त्वरित निकाली न काढल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा ही त्यांनी दिला. मार्च, एप्रिल २०१४ चे वेतन त्वरित देण्यात यावे, शालार्थ वेतन प्रणालीव्दारे वेतन देयके पं.स. स्तरावरून करण्यात यावी, चार टक्के सादील २६ जूनपूर्वी शाळांना प्रदान करण्यात यावे, शासनाकडून निधी प्राप्त न झाल्यास शालेय गणवेश तयार करण्याची शक्ती करण्यात येऊ नये, सार्वत्रिक बदली करण्यापूर्वी हिंदी, मराठी भाषेचा शिक्षक कोण हे स्पष्ट करावे, बदली प्रक्रिया सुरू करण्याच्या पाच दिवसापूर्वी संवर्गनिहाय सेवाजेष्ठता यादी प्रकाशित कराव्या, समायोजन करताना शाळेत रिक्त पद असलेल्या शाळेतच समायोजन करण्यात यावे, आरटीई प्रमाणे प्राथमिक शाळांना ५ वा व पूर्व माध्यमिक शाळाना ८ वा वर्ग जोडण्याची परवानगी सरसकट देण्यात यावी, २० पटसंख्येच्या आतील शाळा बंद करण्यात येऊ नये, प्रकाशित करण्यात आलेल्या सेवाजेष्ठता यादीतील घोड चुका दुरूस्त करण्यात याव्या, शिक्षण सेवकांना कायम करण्याचे आदेश देण्यात यावे, वरिष्ठ वेतन श्रेणीचे प्रकरणे निकाली काढावे, शिक्षकांच्या सहाव्या वेतन आयोगाचे हप्ते व प्रवास भत्ता देयकासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावे, उच्च परीक्षेला बसण्याची कार्योत्तर व नियमित परवानगीचे आदेश देण्यात यावे व शासनाच्या नविन परिपत्रकानुसार शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेकडे द्यावे, अशा विविध मागण्यांना घेऊन शिक्षक संघाच्या पदाधिकार्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी व शिक्षण सभापती मदन पटले यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत जिल्हाध्यक्ष विरेंद्र कटरे, सरचिटणीस एस.यू. वंजारी, यु.पी.पारधी, सुधीर वाजपेई, नुतन बांगरे, केदार गोटेफोडे, रेणुका जोशी, एन.जे. रहांगडाले, प्रदीप गिरीपुंजे, डी.आर.बनकर, एम.जी. नाकाडे, डी.झेड. लांडगे, एल.टी.कारंजेकर, पी.के. पटले, अजय चौरे, के.एल. कटरे, एस.बी. पटले, मोरेश्वर बडवाईक व इतर कार्यकर्त्यांनी भाग घेतला. (तालुका प्रतिनिधी)
शिक्षकांच्या विविध समस्येवर शिक्षक संघ आक्रमक
By admin | Updated: May 11, 2014 00:25 IST