काचेवानी : बोदलकसा कालव्याच्या पाणी वाटपावरून शेतकऱ्यांत मोठाच आक्रोश आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाच घेवून कालव्याची पाळ जेसीबीने तोडण्याची परवानगी दिली. पाळ तोडताना पाटबंधारे विभागाचे अमीन व सहकर्मी उपस्थित असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी होती, असे शेतकऱ्यांनी सांगितले. पाणी सुरू असताना कसलीही तोडफोड किंवा नवीन पाण्याची पायली देता येत नाही. परंतु प्रभारी अभियंत्याने मोबाईल कॉल रिसीव्ह करण्याचे टाळल्याने शेतकऱ्यांचे डोके तापले आहे. काचेवानीजवळ जमुनिया फाट्यावर (उपकालवा) येथे मुख्या पाण्याची पायली असताना सुनियोजित योजनेने जेसीबीने कालवा कापून वेगळ्या जागेतून पाणी नेण्याची व्यवस्था स्वत: पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिली आहे. कालवा कापल्याने सिंदीटोला व बेरडीपार येथील शेतकऱ्यांना टेलवर पाण्याचा पुरवठा होत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. बेरडीपार येथील शेतकरी धनराज पटले, पूरण ठाकरे, जयकुमार रिनाईत, मिलिंद राऊत यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी कालवा जेसीबीने कापल्यामुळे संताप व्यक्त केला. तसेच बोदलकसा पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणत्याही कर्मचाऱ्याने प्रतिसाद दिला नाही. पाच दिवसांच्या सुट्ट्या आल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रूपयांची उकळणी करून कालवा कापण्याची परवानगी शेतकऱ्यांना दिली किंवा स्वत: पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनीच कापले. आता शेतकऱ्यांची ओरड होणार असल्याचे पाहून प्रभारी शाखा अभियंत्यांनी शेतकऱ्यांची बाजू ऐकूण घेणे गरजेचे समजले नाही, असा आरोप केला जात आहे. बोदलकसाचे शाखा अभियंता आगाशे यांनी दुरध्वनीवरून सांगितले की, चालू पाण्याच्या प्रवाहातून नवीन पायली देता येत नाही आणि मायनर कापल्या किंवा तोडल्या जावू शकत नाही. आपण सध्या प्रशिक्षणाला असून बाहेर आहोत, असे ते म्हणाले. प्रभारी शाखा अभियंता आणि प्रभारी उपविभागीय अधिकारी यांच्याशी दुरध्वनीवरून वास्तव जाणून घेण्यासाठी शेतकरी पूरण ठाकरे, जयकुमार रिनाईत यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. तसेच या प्रकाराबाबत क्षेत्राचे अमीन, प्रभारी शाखा अभियंता व प्रभारी उपविभागीय अधिकारी यांच्याशी लोकमतने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होवू शकला नाही. कालवा सुरू करण्यापूर्वी त्यात दुरूस्ती केली जावू शकते. परंतु पाणी सोडल्यानंतर कालव्याचा कापणे हे गुन्ह्याचे प्रकार ठरते. मायनर कापल्याने गुन्हा दाखल करून झालेल्या नुकसानाची भरपाई केल्या जावू शकते. मात्र पाटबंधारे विभागाने याला गांभीर्याने घेतले नाही. उलट त्या काळात शासकीय सुट्ट्यांची संधी स्वत: पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिल्याचा आरोप बेरडीपारचे शेतकरी ईश्वर मेश्राम, जयकुमार रिनाईत यांनी केला आहे. तिरोडा पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी अविनाश जी. पालांदूरकर यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी व कालवा कापणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
जेसीबीने कालव्याची पाळ तोडणाऱ्यावर कारवाई करा
By admin | Updated: October 28, 2014 22:59 IST