सातवा दिवस : पाच पालकांना रुग्णालयात हलविलेदेवरी : सलग सात दिवसांपासून सडक/अर्जुनी तालुक्यातील एस.चंद्रा पब्लिक स्कूलमधील शाळाबाह्य ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उपोषण सुरू आहे. मंगळवारी तेथील पालकांची प्रकृती चिंताजनक झाली. त्यामधील ५ पालकांना पोलीस विभागातर्फे ग्रामीण रुग्णालय देवरी येथे स्थलांतरीत करण्यात आले. सलग सात दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाचा शेवट केव्हा होईल? असा सवाल आदिवासी समाजाकडून केला जात आहे. विद्यार्थ्यांचे भविष्याचे काय होईल? आम्हाला न्याय केव्हा मिळणार? प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे मजा मारणाऱ्या संस्था चालकावर कारवाई केव्हा होणार असा प्रश्न उपोषणकर्ते पिडीत पालकांनी केला आहे. सदर प्रकरणाबाबत आदिवासी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांशी मंगळवारी चर्चा केली असता आम्ही हे प्रकरण निकाली काढू, असे आश्वासन प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिले. परंतु बुधवारपर्यंत हे प्रकरण निकाली लागले नाही तर प्रशासनाच्या विरोधात धडक मोर्चा काढू असा इशारा आॅल इंडिया स्टुडंट फेडरेशन, आदिवासी विद्यार्थी संघ, सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट, बिरसा ब्रिगेड, आदिवासी पालक संघ आदी आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
‘त्या’ उपोषणकर्त्यांची प्रकृती चिंताजनक
By admin | Updated: August 12, 2014 23:48 IST