लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळा तयार करण्यात आली आहे. यासाठी लागणारी यंत्र सामुग्री सुध्दा सिंगापूरहून दाखल झाली असून यात स्वॅब नमुन्यांची ट्रायल चाचणी यशस्वी झाली आहे. याला एम्स आणि आयसीएमआरने आयडी आणि पासवर्ड रविवारी उपलब्ध करुन दिले असून आता सोमवारपासून गोंदिया येथेच स्वॅब नमुन्यांची चाचणी होणार आहे.त्यामुळे जिल्हावासीयांसाठी ही गुड न्यूज आहे.मागील तीन महिन्यापासून सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव आहे.कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने सर्वांचिच चिंता वाढली आहे. गोंदिया येथे शासकीय महाविद्यालय आहे. मात्र या ठिकाणी कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने तपासणीची सुविधा नव्हती. त्यामुळे येथील स्वॅब नमुने तपासणीसाठी नागपूर येथील एम्स आणि मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविले जात होते. त्यामुळे स्वॅब नमुन्याचा अहवाल प्राप्त होण्यास विलंब होत होता. परिणामी रुग्णांवर त्वरीत उपचार करण्यास अडचण होत होती. शिवाय दररोज एका रुग्ण वाहिकेने हे स्वॅब नमुने तपासणीसाठी नागपूर येथे पाठवावे लागत होते. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सुध्दा बसत होता. हीच समस्या ओळखून शासनाने गोंदिया येथे स्वॅब नमुने तपासणी प्रयोगशाळेला मंजुरी दिली. यानंतर यासाठी सिंगापूरहून आवश्यक यंत्रसामुग्री मागविण्यात आली.पंधरा दिवसांपूर्वीच ही यंत्रसामुग्री दाखल झाली असून तज्ज्ञांकडून त्याचे इन्स्ट्रॉलेशन सुध्दा पूर्ण करण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी (दि.५) या प्रयोगशाळेत स्वॅब नमुन्यांची ट्रायल घेण्यात आली. तसेच येथे तपासणी केलेल्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल नागपूर येथील एम्स आणि मेयोच्या प्रयोगशाळेतील अहवालाशी जुळतात का याची चाचपणी करण्यात आली. शनिवारी (दि.६) हे नमुने जुळत असल्याचे स्पष्ट झाले.त्यानंतर आयसीएमआरकडे ही सर्व माहिती पाठविण्यात आली. त्यानंतर आयसीएमआरने याला रविवारी मंजुरी दिली असून यासाठी लागणारे आवश्यक आयडी आणि पासवर्ड सुध्दा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला उपलब्ध करुन दिले आहे.त्यामुळे येथील प्रयोगशाळेत सोमवारपासून (दि.८) नियमित स्वॅब नमुन्यांची चाचणी करण्यात येणार आहे. परिणामी नागपूर स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्याची गरज राहणार नाही.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने तपासणीची प्रक्रिया सोमवारपासून सुरू केली जाणार आहे. त्यामुळे आता नागपूर येथे नमुने तपासणीसाठी पाठविण्याची गरज नसून त्वरीत अहवाल प्राप्त होणार असल्याने रुग्णावर त्वरीत उपचार करण्यास मदत होणार आहे.- डॉ.व्ही.पी.रुखमोडे, (अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय)
आता गोंदियातच होणार स्वॅब नमुन्यांची चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 05:00 IST
मागील तीन महिन्यापासून सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव आहे.कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने सर्वांचिच चिंता वाढली आहे. गोंदिया येथे शासकीय महाविद्यालय आहे. मात्र या ठिकाणी कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने तपासणीची सुविधा नव्हती. त्यामुळे येथील स्वॅब नमुने तपासणीसाठी नागपूर येथील एम्स आणि मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविले जात होते.
आता गोंदियातच होणार स्वॅब नमुन्यांची चाचणी
ठळक मुद्देआयसीएमआरची मंजुरी : आजपासून नियमित होणार चाचणी