गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येरंडी देवलगाव गावात एक जीबीएस चा संशयीत रुग्ण आढळल्याचे बुधवारी (दि.५) पुढे आले. एका १४ वर्षीय मुलाला या आजाराची लक्षणे आढळल्याने त्याच्यावर नागपूर येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येरंडी देवलगाव येथील १४ वर्षीय मुलगा अर्जुनी मोरगाव येथील जीएमबी विद्यालय येथे आठव्या वर्गात शिकत आहे. त्याची प्रकृती १७ जानेवारीला अचानक बिघडली. लगेच त्या मुलाला अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात १८ जानेवारीला दाखल करण्यात आले. मात्र त्याच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत नसल्याने त्याच दिवशी सांयकाळी ६ वाजता गोंदिया जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तिथेही प्रकृतीत सुधारणा दिसून येत नसल्याने त्याच दिवशी रात्री नागपूरला हलविण्यात आले. एका खाजगी दवाखान्यात भरती केल्यानंतर तिथे एमआरआय करण्यात आले. यानंतर त्याला नागपूर येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. रक्त तपासणी नसाचे स्कॅनिंग कमरेतील पाण्याचे रिपोर्ट घेऊन तपासणी केली असता सदर मुलाला जीबीएसची लक्षणे आढळल्याची माहिती आहे. त्यामुळे एम्स रुग्णालयातील मुलांच्या अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले. गेल्या १८ दिवसांपासून एम्स रुग्णालयात सदर मुलावर उपचार सुरु आहेत. या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील देवलगाव येथे एक जीबीसीएसचा संशयीत रुग्ण आढळला आहे. पण तपासण्या पुर्ण झाल्यानंतरच याबाबत अधिकृतपणे सांगता येईल. जीबीएसच्या अनुषंगाने आरोग्य विभाग सर्व पुर्व तयारी केली आहे.
- डॉ. अमरीश मोहबे, जिल्हाशल्यचिकित्सक गोंदिया