बिजेपार येथील घटना : विनातिकीट प्रवासी पकडल्याचा ताणबिजेपार : तिकिटाविना प्रवास करणारे पाच प्रवासी एसटीमधून २५ आॅक्टोबर रोजी पकडण्यात आले. यामुळे मानसिक तणावात रात्र काढणाऱ्या एसटी वाहकाने रविवारी (दि.२६) पहाटे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना येथील ग्राम पंचायत कार्यालयाजवळील सार्वजनिक विहिरीत घडली. धनलाल मोहनलाल नागपुरे (५५, रा. तुमखेडा खुर्द) असे आत्महत्या करणाऱ्या एसटी वाहकाचे नाव आहे.एसटी बस एम.एच.२०/डी.८७०२ ची नियमित तपासणी आमगाव देवरी मार्गावरील हरदोली येथे शनिवारी (दि.२५) करण्यात आली. या तपासणीत या बसमध्ये पाच प्रवासी विनातिकीट आढळले होते. विभागीय कार्यलयातील सहायक वाहतूक निरीक्षक जीभकाटे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारी ही तपासणी केली होती. या तपासणीत आपण दोषी आढळणार याची खंत धनलाल यांना रात्रभर राहिली. तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्याचा मोबाईलही जप्त केला होता. त्यामुळे तो अधिकच तणावात होता. एसटीमध्ये चालक व वाहकाला मोबाईल नेणे बंदीचे असल्यामुळे धनलाल अधिकच धास्तावले होते. त्यांनी सायंकाळची फेरी डोमाटोलापर्यंत नेऊन परत येताना बिजेपार येथे विश्रांती (हॉल्टिंग) घेतली. रात्री जेवण केल्यावर चालक मुस्ताक व धनलाल दोघेही झालेल्या कारवाईबाबत विचार करीत होते. रात्री उशिरा दोघेही बसमध्ये झोपले. त्यानंतर पहाटे ४ वाजता दरम्यान उठल्यावर धनलालने चालक मुस्ताक यास शौचालयास जातो असे सांगितले. लुंगी व बनियानवरच शौचालयासाठी गेल्यावर सकाळी ७.३० वाजतापर्यंत ते बसजवळ न आल्याने वाहक मुस्ताक याला चिंता सतावत होती. त्यानंतर मुस्ताकने ते न आल्याची माहिती बिजेपार येथील एओपीचे प्रमुख उमेश महाले यांना दिली. त्यानुसार धनलाल यांचा शोध घेतल्यावर त्यांचा मृतदेह ग्राम पंचायतच्या सार्वजनिक विहिरीत ३५ फूट खोल पाण्यात आढळला. कोटरा येथील कृषी सेवक राजू मेश्राम यांनी धनलालचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. शनिवारी बस आगाराच्या विभागीय कार्यालयाने केलेल्या कारवाईमुळे ते रात्रभर चिंताग्रस्त असल्याचे चालक मुस्ताक यांनी सांगितले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सालेकसाच्या ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आला. (वार्ताहर)
एसटी वाहकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
By admin | Updated: October 26, 2014 22:42 IST