: महागाव सहवनक्षेत्रातील बुटाई १ राखीव वनकक्ष क्र २५५ येथील वनजमिनीवर सुमारे ८ ते १० वर्षांपासून अतिक्रमण करून शेतजमीन केली जात आहे. ही जमीन शासन जमा करण्याची मागणी घनश्याम बावनकर यांनी केली आहे.
बुटाई क्र.१ मधील गट न २५५ वर माहुरकुडा येथील शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून शेती काढली आहे. या गटातील वृक्षतोड करण्यात आली. २०१२-१३चे सुमारास महागाव बिटचे क्षेत्र सहायक व वनरक्षकाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. या संबंधाने अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. मात्र, वनविभागाकडून कानाडोळा केला जात आहे. तत्कालीन वन अधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढून घेतले होते. त्यावेळी अतिक्रमणधारकाने शंभर रुपयांच्या मुद्रांकावर मी या जागेवर पुन्हा अतिक्रमण करणार नाही, असे कार्यकारी दंडाधिकाऱ्यासमोर लेखी हमीपत्र लिहून दिले होते. त्यानंतरही २१ जून, २०१३ रोजी पुन्हा त्याच जागेवर खोदकाम केले होते. त्याची वन विभागाच्या वतीने अर्जुनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. नवनीतपूरच्या संयुक्त वनव्यवस्थापन समिती सदस्य व ग्रामस्थांनी १७ जुलै, २०१७ रोजी या जागेवर श्रमदानातून वृक्षलागवड करण्याचा ठराव घेतला होता. ४०० झाडांची लागवडही केली होती. मात्र, वनविभागाच्या या जागेवर अद्यापही अतिक्रमण कायम आहे. या जागेवरील अतिक्रमण काढून ही जागा शासन जमा करण्याची मागणी घनश्याम बावनकर यांनी केली आहे.