गोंदिया : उत्तर प्रदेशच्या बनारस येथील २२ वर्षाचा मांत्रिक तीन दिवसांपासून गोंदियात आहे. कोणताही आजार मंत्राने बरा होतो, असे सांगणार्या या मांत्रिकाला अंधश्रध्दा निमूर्लन समितीने पोलिसांच्या स्वाधीन केले. पंडीत हिमांशू पांडे (२२) असे अटक करण्यात आलेल्या मांत्रिकाचे नाव आहे. टीबीटोलीच्या गायत्री नगरातील अंकीत जितलाल शहारे (२८) या तरूणाला अल्सर झाला. त्याच्या आजारावर तांत्रिक विद्येने व मंत्र-तंत्राने होम, हवन करून उपचार करतो, असे त्याने सांगितले. त्यावर उपचारासाठी या मांत्रिकाने अंकित शहारेकडून १५ तारखेला ११ हजार रुपये घेतले. परंतु कसलाही उपचार केला नाही. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा उपचार करण्यासाठी २१ हजारांची मागणी केली. परंतु उपचार न करताच वाढत्या पैशाच्या मागणीला पाहून अंकित शहारेने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे मांत्रिक हिमांशु पांडे याने तांत्रिक विद्येने अंकित शहारेला ठार करण्याची धमकी दिली. यामुळे भयभित झालेल्या अंकिश शहारेने या मांत्रिकाविरोधात अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या पदाधिकार्यांच्या सहकार्याने रामनगर पोलिसात तक्रार केली. रामनगर पोलिसांनी आरोपीविरूध्द भादंविच्या कलम ४२०, सहकलम ३, महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष, अनिष्ठ, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यास आले असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे करीत आहे. आरोपीला शनिवारी जिल्हा सत्र न्यायालयात सादर करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)
अल्सर बरा करण्याच्या नावावर लुबाडणार्या मांत्रिकाला अटक
By admin | Updated: May 17, 2014 23:44 IST