गोंदिया : चोवीस तास पिण्याचे पाणी उपलब्ध करवून देण्याच्या नावावर चांगलीच गाजलेली शहराची वाढीव पाणी पुरवठा योजना पाच वर्षांतही अद्याप पूर्ण झालेली नाही. योजनेंतर्गत बांधकाम करण्यात आलेल्या तीन टाक्या तयार असून पाईप लाईन टाकण्याचे कामच अपूर्ण आहे. या पाईपलाईन टाकण्याच्या कामासाठी शहरातील चांगल्या रस्त्यांची ऐशीतैशी केली जात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. आता पाईपलाईन टाकण्याचे काम कधी पूर्ण होणार व या योजनेतून पाणी पुरवठा कधी होणार याची वाट शहरवासी बघत आहेत. आॅगस्ट २००९ पासून शहराच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामाला सुरूवात करण्यात आली. ६१.३८ कोटींच्या या योजनेंतर्गत शहरात पाण्याच्या तीन टाक्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. या टाक्यांचे बांधकाम झाले असून पाईप लाईन टाकण्याचेच काम पूर्ण न झाल्याने या टाक्या शोभेच्या ठरत आहेत. विशेष म्हणजे पाईप टाकण्यासाठी शहरातील चांगले व नवनिर्मित रस्तेही खोदण्यात येत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. पाईप लाईनच्या या कामांतर्गत सिव्हील लाईन्स परिसरात सध्या काम सुरू असल्याचे दिसून येत असून तेथे हा प्रकार नजरेत आला. आता पाईप लाईनचे हे काम कधी पूर्ण होणार व पाणी पुरवठा कधी सुरू होणार असा प्रश्न शहरवासी एकमेकांना करीत आहेत. एकीकडे शहरातील बहुतांश सर्वच रस्ते खराब असून त्याचा त्रास शहरवासी सहन करीत आहेत. त्यात मात्र नियोजनशून्य कामामुळे या रस्त्यांचीही ऐशीतैशी केली जात आहे. विशेष म्हणजे शहरवासीयांना चोवीस तास पाणी पुरवठा होणार असल्याचे सांगत या योजनेचा चांगलाच गाजावाजा करण्यात आला होता. त्यानुसार सन २००९ पासून योजनेच्या कामाला सुरूवात करण्यात आली. आता पाच वर्ष होत असले तरी योजना काही पूर्ण झालेली नाही. या योजनेला घेऊन अधिकाऱ्यांकडूनही फिरवाफिरवीचे उत्तर दिले जात आहे. अशात शहरवासी मात्र या योजनेला घेऊन फक्त आशा बाळगून असले तरी त्यांच्या आशा आणखी किती दिवस पूर्णत्वास येतात हे सांगणे कठीण आहे. अधिकारी आश्वासन देत असले तरी ते पूर्ण होतात काय हे बघायचे आहे. (शहर प्रतिनिधी)
शहरातील रस्त्यांंची ऐशीतैशी
By admin | Updated: January 24, 2015 22:57 IST