बाराभाटी : अलिकडे मनोरंजनाच्या खेळातून पैसे कमविण्याचे दिवस गेले आहेत. मात्र पर्याय नसलेले कलावंत वेगवेगळ्या कसरती दाखवून आणि प्रसंगी जीवावर उदार होऊन लोकांचे मनोरंजन करतात. यातून मिळणाऱ्या अल्प मिळकतीवर त्यांचा संसार चालतो. येरंडी या गावात कसरतीचा खेळ दाखविण्यासाठी आलेला गफूर सय्यद हा त्यापैकीच एक. संपूर्ण महाराष्ट्रात कसरतीचा खेळ दाखवता-दाखवता तो गोंदिया जिल्ह्यातील येरंडीमध्ये दाखल झाला. तब्बल दोन तास तो गावकऱ्यांचे मनोरंजन करतो. गफूर काशीम सय्यद (४१) हा मालेगाव जि. नाशिकचा रहिवासी आहे. सोबत पत्नी आक्सिमा, मुलगा सुलतान व दोन लहान मुली असा कुटूंबाचा गाडा घेऊन तो या गावातून त्या गावात जातो. आतापर्यंत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सहा गावांत त्याने कसरतीचे खेळ दाखविले. गणेश उत्सव, शारदा-दुर्गा उत्सवात सुद्धा कसरतीचे खेळ सुरू होते. या कसरतीमध्ये गफूर हा १०-१० प्रकारची कलाकारी करुन दाखवितो. हातावर चालणे, हवेत उडी मारणे, १० फूट उंच उडी मारणे, शेरो-शायरी करणे, ढोलक वाजवून मनोरंजन करणे, केसांनी गोल-गोल सायकली फिरविणे, केसांनी मुलांना फिरवणे, केसांनी ट्रॅक्टर जीप (मोठे वजन) ओढणे, केसांनी दगड उचलणे, डोळ्यांच्या पापणीने खुर्ची उलचणे, टायगर जम्प घेणे अशा सर्व प्रकारच्या कसरती त्याच्यासह सुलतान नावाचा त्याचा मुलगाही करतो. पत्नी ढोलक वाजवते. त्याचा खेळ हा कसरतच नसून जगण्यासाठीचे साधन बनला आहे.(वार्ताहर)
पोटासाठी गफूर करतो जीवाच्या कसरती
By admin | Updated: October 25, 2016 00:49 IST