गोंदिया : शहर पोलीस स्टेशनच्या मागे असलेल्या पोलीस क्वार्टर्सच्या जागेवरील पार्कींग झोनच्या कामाला राज्य शासनाच्या गृह तथा सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूरी दिली आहे. त्यामुळे या पार्कींग झोनच्या कामाला प्रारंभ करण्यात आला असून या जागेवर असलेल्या पोलीस क्वार्टर्सला तोडण्याचे काम सध्या सुरू आहे. १६ हजार स्क्वे.फुट जागेवर तीन मजली पार्कींग झोन तयार केले जाणार असून येत्या महिन्याभरात या जागेवर सुमारे तीन हजार दुचाकींची पार्कींग नगर परिषद सुरू करणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. शहरात बाजारातील अरूंद रस्ते व पार्कींगच्या व्यवस्थे अभावी नागरिक जागा मिळेल तेथे आपली वाहने उभी करून मोकळे होत असल्याचे चित्र आहे. यामुळे मात्र बाजारातील वाहतूकीची व्यवस्था विस्कळीत होते व ट्राफीक जामचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. अशात वाहतूक पोलीस कित्येकदा वाहन उचलून नेतात किंवा त्यांचे चालान करतात. हा प्रकार थांबावा यासाठी शहर पोलीस स्टेशनच्या मागे असलेल्या पोलीस क्वार्टर्सच्या जागेवर पार्कींग झोन तयार करण्याचा नगर परिषदेचा विचार सुरू होता. सुमारे १६ हजार स्क्वे.फुट जागेवर सध्या पोलिसांची काही जुनी क्वार्टर्स तसेच पोलीस अधिक्षकांचा जुना बंगला आहे. मात्र ही जागा पोलीस क्वार्टर्ससाठी असल्याने पोलीस विभागाचा या पार्कींग झोनला विरोध होता. तर तत्कालीन पोलीस अधिक्षक सुखविदंरसिंह, मिलींद भारंबे, छेरिंग दोरजे, प्रदीप देशपांडे व विद्यमान पोलीस अधिक्षक दिलीप झलके यांनीही राज्य शासनाकडे या प्रस्तावाचा विरोध नोंदविला होता. यावर आमदार गोपालदास अग्रवाल यांनी पाठपुरावा केल्याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व गृहमंत्री आर.आर.पाटील हस्तक्षेप करून हा मुद्दा सोडविला. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी जमिनीचा ताबा नगर परिषदेला देण्या संदर्भात पोलीस अधिक्षकांना आदेश दिले. त्यावर पोलीस अधिक्षकांनी सदर जागेचा ताबा २२ मे रोजी नगर परिषदेला दिला. जागेचा ताबा मिळाल्याने नगर परिषदेने ही जागा सपाट करण्यासाठी येथील पोलीस क्वार्टर्स तोडण्यास सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे या जागेवर तीन मजली पार्कींग झोन तयार केले जाणार असून त्यात दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पार्कींगची व्यवस्था राहणार आहे. तर जुलै महिन्यापासून या जागेवर सुमारे तीन हजार दुचाकींच्या पार्कींगची व्यवस्था सुरू करण्यात येणार असल्याची शक्यता दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)
शहरातील पार्किंग झोनच्या कामाला प्रारंभ
By admin | Updated: June 25, 2014 00:30 IST