गोंदिया : युवक काँग्रेसने आता युवकांना संधी देत त्यांच्यातील कौशल्य विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. याच अंतर्गत युवक काँग्रेसने प्रवक्त्यांचा शोध घेण्यासाठी यंग इंडिया के बोल हा कार्यक्रम आयोजित केला आहे. याअंतर्गत तालुका, जिल्हा आणि विभागीय, राज्य, राष्ट्रीय स्तरावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे. यातूनच प्रवक्त्यांची निवड केली जाणार असल्याचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष आलोक मोहंती यांनी सांगितले.
या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात गुगल फॉर्मच्या माध्यमातून यासंबंधित माहिती गोळा केली जाणार आहे. १ ऑक्टोबरपर्यंत या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात जिल्हास्तरावर स्पर्धकांना बोलावून भाषण स्पर्धा घेण्यात येणार आहे. यातून पाच स्पर्धकांची निवड केली जाणार आहे. यानंतर यातीलच पाच स्पर्धकांची राज्य स्तरासाठी निवड केली जाणार आहे. सर्वच राज्यातील निवड केलेले पाच पाच स्पर्धक १४ नाेव्हेंबर रोजी दिल्ली येथे होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यातून राष्ट्रीय स्तरावरील प्रवक्त्यांची निवड केली जाणार आहे. यात जिल्ह्यातील स्पर्धकांनीसुद्धा सहभागी व्हावे, असे आलोक मोहंती यांनी कळविले आहे.