अंकुश गुंडावारलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रेल्वे विभागाने काही दिवसांपूर्वीच नियमित गाड्यांना दिलेला विशेष गाड्यांचा दर्जा काढला; पण यानंतरही या लोकल आणि पॅसेंजर गाड्यांना अद्यापही एक्स्प्रेसचेच तिकीट आकारले जात आहे. तर अद्यापही एक्स्प्रेस गाड्यांना जनरलचा डबा जोडण्यात आला नाही. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असताना आता ओमायक्रॉनने डोके वर काढले आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर दिला जात आहे. केरळसह काही राज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच रेल्वे गाड्यांमधून प्रवास करण्याची मुभा दिली आहे. मात्र, हा नियम अद्यापही महाराष्ट्रात लागू करण्यात आला नाही. सर्वांनाच सध्या रेल्वे गाड्यांमधून प्रवासाची परवानगी दिली आहे. लसीचे दोन डोज घेतल्याची सक्ती करण्यात आली नाही. विशेष गाड्यांचा दर्जा काढला असला तरी अद्यापही या गाड्यांना जनरलचे डबे न जोडले नसल्याने त्याचा प्रवाशांना कसलाच उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. उलट प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.
प्रवाशांना बसतोय आर्थिक फटका? - रेल्वे नियमित गाड्यांना विशेष गाड्यांचा दिलेला दर्जा काढल्याचे सांगितले. मात्र, या गाड्यांना अद्यापही जनरलचे डबे जोडले नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना एक्स्प्रेसचे तिकीट मोजावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या खिशावरील भार अद्यापही कमी झाला नाही. तर या गाड्यांना जनरलचे डबे जोडणार केव्हा, असा प्रश्न आता प्रवाशांकडून केला जात आहे.
दिवसाला १२ लाखांचे उत्पन्न - हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया हे प्रमुख रेल्वे स्थानक असून या रेल्वे स्थानकावरून दररोज ५३ गाड्या धावतात. तर दररोज १५ हजारांहून अधिक प्रवासी ये-जा करतात. गोंदिया रेल्वे स्थानकाचे दररोजचे १२ लाखांचे उत्पन्न आहे. कोरोनाच्या कालावधीत थोडे उत्पन्न कमी झाले होते; पण आता ते पूर्वपदावर येत आहे.
सध्या सुरू असलेल्या एक्स्प्रेस गाड्या- गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस- गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस- हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस- नागपूृर-बिलासपूर इंटरसिटी एक्स्प्रेस- हावडा-मुंबई एक्स्प्रेस- अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस- अजमेर-पुरी एक्स्प्रेस - समता एक्स्प्रेस
या ठिकाणी केव्हा मिळणार थांबे?
- कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येताच रेल्वेने गाड्यांची संख्या वाढविली आहे. सध्या गोंदिया रेल्वे स्थानकावरून ५३ गाड्या धावत आहेत. मात्र, या गाड्यांनी तिरोडा, तुमसर, सालेकसा, आमगाव या रेल्वे स्थानकांवर अद्यापही थांबे देण्यात आले नाहीत. त्यामुळे या रेल्वे स्थानकावर थांबे मिळणार केव्हा, असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे. तर थांबे नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे.