पावसाने फिरविली पाठ : बळीराजावर पुन्हा अस्मानी संकटआमगाव : तालुक्यात पावसाने पेरणीच्या वेळी पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांनी शेतात पेरलेली बियाणे अंकुर लागण्याअगोदरच नष्ट झाली आहते. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याशिवाय पर्याय नसून यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.तालुक्यात उशिरा का होईना दोन दिवस पावसाने समाधानकारक हजेरी लावली व शेतकऱ्यांना पेरणीला वेळ मिळाला. शेतकऱ्यांनी शेतातील मशागत पूर्ण करुन बियाण्यांची लागवड करण्यास सुरुवात केली. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून बियाण्यांची लागवड केली. यासाठी शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या जातीचे बियाणे खरेदी केले. दोन दिवस पाऊस पडल्याने शेतकरी समाधानी होता. परंतु बियाण्यांंची लागवड होऊन पंधरवडा संपला तरी पावसाने तालुक्यात हजेरी लावली नाही. त्यामुळे बळीराजाने पेरणी घातलेले भात बियाणे धान्य अंकुर निघण्याआधीच नष्ट झाले आहेत. अनेक शेतांमध्ये अंकुर निघाले परंतु पाण्याअभावी ते करपल्याचेही चित्र दिसून येत आहे. एकंदर पुन्हा एकदा अस्मानी संकटाच्या सापळ््यात शेतकरी अडकला आहे. तालुक्यात पाऊस समाधानकारक पडेल असा तर्क शेतकऱ्यांनी लावला होते. परंतु तालुक्यात १ जून ते २५ जून या कालावधीत दोनच दिवस १२४.६ मि.मी. पाऊस बरसल्याची नोंद आहे. पावसाचा अंदाज घेत शेतकऱ्यांनी बियाण्यांची लागवड करून घेतली. परंतु पावसाने ऐनवेळी पाठ फिरविल्याने बळीराजाची फसगत झाली. शेतातील बियाणे पाण्याअभावी नष्ट झाली असून बळीराजा आता दुबार पेरणीचे संकट आले आहे. (शहर प्रतिनिधी)
पेरलेली ५० टक्के बियाणे नष्ट
By admin | Updated: June 26, 2014 23:20 IST