विविध कार्यक्र म : शाळांमध्ये प्रश्नमंजुषा व वादविवाद गोंदिया : जिल्ह्यात ८ ते १५ एप्रिल या कालावधीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहाचे उद्घाटन दि.८ ला सकाळी १० वाजता सामाजिक न्याय भवन गोंदिया येथे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. ९ एप्रिल रोजी सामाजिक न्याय भवन येथे सामाजिक न्याय विभागांतर्गत असलेल्या सर्व महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या माहितीपर मार्गदर्शन व त्याअंतर्गत कर्जाचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात येणार आहे. १० एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय, शाळा, निवासी शाळा, आश्रम शाळा, शासकीय व अनुदानित वसतिगृहांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील लघुनाट्य, प्रश्नमंजुषा व वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. ११ एप्रिल रोजी आरोग्य विभागाच्या सहकार्याने आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. १२ एप्रिल रोजी सर्व शासकीय कार्यालय व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने जिल्ह्यातील सर्व महत्वाच्या ठिकाणी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. १३ रोजी जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती, विचारवंत, नामवंत पत्रकार तसेच सामाजिक चळवळीतील प्रसिध्द व्यक्ती यांचे समाज प्रबोधनपर विविध विषयांवर व्याख्यानाचे आयोजन करण्यात येणार आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नामवंत लोककलावंत यांचे विविध सामाजिक विषयांवर प्रबोधनपर कार्यक्र म होणार आहे. १४ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी काळे यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय भवन येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचा समारोप होईल. (जिल्हा प्रतिनिधी)
आजपासून सामाजिक समता सप्ताह
By admin | Updated: April 8, 2017 00:50 IST