ओ.बी.डोंगरवार - आमगावबहीण-भावातील प्रेमाची सर दुसऱ्या कोणत्याही नात्यातील प्रेमाला येत नाही. भावाबहिणीतील मायेमुळेच त्यांचा जीव एकमेकांमध्ये गुंतलेला असतो. याचाच प्रत्यय कालीमाटी व कलपाथरी येथील गावकऱ्यांना आला. भावाच्या मृत्यूची बातमी ऐकून बहिणीनेही देह त्यागल्याच्या या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.प्राप्त माहितीनुसार, कालीमाटी येथील सुखदेव महारू रहांगडाले (३५) याचे कातुर्ली गावाजवळ त्यांचाच मॅटाडोर उलटल्याने मृत्यू झाला. भावाच्या मृत्युची बातमी सुखदेवची मोठी बहीन एननबाई बिसेन यांना समजताच त्या बेशुद्ध होऊन पडल्या. काही तासांनी त्यांनीही मृत्यूला जवळ केले. सुखदेव रहांगडाले यांचा कालीमाटी येथे वीटांचा व्यवसाय आहे. त्यांनी स्वत:च्या मॅटाडोरने सासरे चंद्रशेखर ठाकुर मु.चुलोद यांच्याकडून विटा बनविण्याकरीता लागणारा भसवा घेतला आणि ते गावाकडे येत होते. मात्र काळाने त्यांच्यावर झडप घातली व कातुर्ली गावाजवळ त्यांची मॅटाडोर उलटला. त्यातच सुखदेव गंभीर जखमी होऊन ठार झाले. मॅटाडोर स्वत: सुखदेव चालवित होते. शुक्रवारी रात्री ८.३० वाजता ही घटना घडली. गाडीत सुखदेवचा साळा होता. त्यालापण दुखापत झाली. उपचाराकरीता गोंदिया येथे हलविण्यात आले. सुखदेवच्या मृत्युची बातमी मोठी बहीण एननबाई हेकलाल बिसेन मु.कलपाथरी ता.जि.बालाघाट यांना रात्री ९ वाजताच्या सुमारास कळविण्यात आली. भावाच्या मृत्युची बातमी ऐकताच एननबाई बेशुद्ध पडल्या. त्यांना त्याच अवस्थेत गोंदिया येथे आणण्यात आले. मात्र डॉक्टरच्या सांगण्यानुसार ऐननबाईची जिवंत राहण्याची शक्यता कमी होती. त्यामुळे त्यांना बेशुद्ध अवस्थेतच मृतक सुखदेवच्या घरी कालीमाटी येथे आणले. यावेळी रात्रीचे १२ वाजले होते. अर्धवट बेशुद्ध अवस्थेतच त्यांनी आपल्या भावाचे अंत्यदर्शन घेतले व कलपाथरी येथे शनिवारी पहाटे ३ वाजताच्यादरम्यान मृत्युला जवळ केले.या दोन्ही बहीणभावाचा मृत्यू कालीमाटी व कलपाथरी परिसरात चर्चेचा विषय झाला आहे. मृतक सुखदेवच्या मृत्युनंतर तपासणी करीत आमगाव येथे ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले होते. पोस्टमार्टमनंतर प्रेत त्यांच्या कुटुंबियाच्या स्वाधीन करून दुपारी कालीमाटी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
भावाच्या मृत्यूचे वृत्त ऐकून बहिणीनेही सोडला जीव
By admin | Updated: December 20, 2014 22:41 IST