बाराभाटी : मागील तीन दिवसांपासून एक बिबट्याने सुरगाव येथे चांगलाच कहर केला आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. साहेब बिबट आमच्या जिवावर उठलाय अशी आर्त हाक गावकरी देत असून, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सुरगाव व देवलगाव या भागात बिबट्याची फारच दहफत आहे. काही दिवसांपूर्वी याच बिबट्याने गावातील कोंबड्या बकऱ्यांवर ताव मारला होता. यामुळे पशुपालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच रात्रीच्या वेळेस गावकऱ्यांचे बाहेर पडणे सुद्धा कठीण झाले होते. तेव्हा गावकऱ्यांनी बिबट्याला परतावून लावण्यासाठी मशाली पेटवून आणि जागरण करून परतावून लावले होते. आता पुन्हा बिबट्याचा शिरकाव वाढला असल्याने तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वनविभागाने याची दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
.....
आमच्या गावात अनेकवेळा बिबट येते, यापूर्वी पशुहानी झाली आहे. वनविभागाने वेळीच उपाययोजना करुन बिबट्याचा बंदोबस्त लावण्याची मागणी केली आहे.
- मुकेश मेश्राम, नागरिक सुरगाव
===========
आम्ही रात्री गेलो, तब्बल दोन तास पाहणी केली, माझ्यासोबत बीट गार्ड व वनमजूर होते. मात्र बिबट्याचा पत्ता लागला नाही. यापुढे गावात चौकी बसविण्याचा विचार सुरू आहे.
- विजय करंजेकर, सहायक परिक्षेत्राधिकारी, कुभिंटोला-बाराभाटी क्षेत्र
===============
कोरोनाच्या संकटात हे आणखी बिबट्याचे संकट आले आहे. मी जिल्ह्याचे ए.सी.एफ. अधिकाऱ्यांशी बोलून बिबट्याचा बंदोबस्त लावण्यास सांगितले आहे.
- मनोहर चंद्रिकापुरे, आमदार
--------------------
वनविभागाने कुटी बनवून राहावे
या परिसरात दाट जंगल असल्याने बिबट्याचे व वन्यप्राण्यांचा या परिसरात मोठ्या प्रमाणात वावर आहे. वन्यप्राणी अनेकदा गावांत येऊन नुकसान करतात. त्यामुळे वन्यप्राण्यांचा वेळीच बंदोबस्त लावण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी कुटी तयार करून गस्त देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.