गोंदिया : ग्रामीण भागातील रस्ते अरुंद व वळणदार असल्याने अपघात घडतात. हे अपघात टाळण्यासाठी तालुक्यातील ग्राम इर्री येथील उपसरपंच रवी तरोणे यांनी पुढाकार घेत वळणदार रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झुडपाची छाटणी करून वाहन चालकांना दिलासा देणारे काम केले.
अरुंद व वळणदार रस्त्याच्या दोन्ही बाजूला झुडूप तयार झाल्याने, समोरून येणारे वाहन विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहन चालकांना दिसत नसल्याने, वाहनांची समोरासमोर धडक होऊन अपघात घडतात. आसोली ते नवरगाव (कला) रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात झुडूप वाढले होते. एवढेच नव्हे तर झाडाच्या फांद्या रस्त्यावर आल्या होत्या व त्यामुळे अपघात होण्याची शक्यता होती. एकंदरीत रस्त्याच्या बाजूला असलेली वाढलेली झुडुपे अपघाताला आमंत्रण देत होती. वळणावर झाडाच्या फांद्या आल्यामुळे रहदारीसाठी वाहनधारकांना खूप त्रास सहन करावा लागत होता. त्यातच काही दिवसांपूर्वी दुचाकीचा अपघात झाल्यामुळे ग्राम इर्री येथील उपसरपंच तरोणे यांनी रस्त्याच्या वळणावर असलेल्या झुडपाची छाटणी केली. या कामात पिंटु हुमे, सोनू फुंडे, राजकुमार महारवाडे, लक्ष्मीप्रसाद देवगडे, महेंद्र हेमने, शैलेश भीमटे यांनी त्यांना सहकार्य केले.