बीड / परळी : तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त जिल्ह्यातील प्रमुख शिवमंदिरे गजबजणार असून, मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आहे.बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळी येथील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यातून रविवारी रात्रीच भाविक शहरात दाखल झाले होते. काही भाविकांनी रात्रीच दर्शनाचा लाभ घेतला. श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारला विशेष महत्त्व मानले जाते. त्यानुषंगाने भाविकांची येथे दिवसभर रीघ लागणार आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे. मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले असून, भाविकांसाठी फराळ, पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विश्वस्थ समितीच्या वतीने सर्व तयारी झाल्याचे सचिव राजेश देशमुख यांनी सांगितले.बीडमधील कनकालेश्वर या पुरातन मंदिरासह सोमेश्वर, पापनेश्वर, जटाशंकर या मंदिरात पूजा, अभिषेक, भजन, कीर्तन आदी कार्यक्रम पार पडणार आहेत. याशिवाय, बीड तालुक्यातील श्री क्षेत्र कपिलधार येथे देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी एस.टी. महामंडळाच्या वतीने जादा बसेसची सुविधा करण्यात आली आहे.ठिकठिकाणची शिवमंदिरे गर्दीने फुलून जाणार असून, वातावरण भक्तीमय बनणार आहे. हर हर महादेवचा जयघोष होणार आहे.
जिल्ह्यातील शिवमंदिरे गजबजणार !
By admin | Updated: August 22, 2016 01:31 IST