गोंदिया : गावातीलच १४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने सात वर्षाचा सश्रम करावास व पाच हजार रूपये दंड ठोठावला आहे.प्राप्त माहितीनुसार, रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बेलटोला निलज येथील छोटू उर्फ हरिचंद बारीकराम मडावी (३६) याने गावातीलच १४ वर्षाच्या मुलीवर २८ सप्टेंबर २०११ रोजी रात्री ९.३० वाजतादरम्यान बळजबरी केली होती. ती पिडीत मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत नवरात्रीचा जवारा पाहण्यासाठी गावातीलच मातामाय मंदिरात गेली होती. परंतु तिला झोप लागत असल्याने ती एकटीच घरी परत येत होती. यावेळी मी तुला तुझ्या घरी सोडून देतो असे म्हणून आरोपी तिच्यासोबत आला. काही दूर अंतरावर जाऊन तिचा तोंड दाबून त्याने तिला आपल्या घरी नेले. तिला धमकी देत तिच्यावर बळजबरी केली. या संदर्भात रावणवाडी पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३७६, ५०६ ब अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक बी.जी. पठारे यांनी केला. प्रकरणावर सुनावणी मंगळवारी जिल्हासत्र न्यायाधिश एम.जी. गिरटकर यांनी सुनावणी केली. बलात्कारातील आरोपी छोटू उर्फ बारीकराम मडावी (३६) याला कलम ३७६ अंतर्गत सात वर्षाची शिक्षा, पाच हजार रूपये दंड, कलम ५०६ अन्वये एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून अॅड.विणा बाजपेयी यांनी काम केले. पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनात सीएमएस सेलचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महाले यांनी कामकाजासाठी सहकार्य केले.
बलात्काऱ्याला सात वर्षांची शिक्षा
By admin | Updated: March 6, 2015 01:39 IST