लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येत्या २ सप्टेंबरपासून हिंदू धर्मीयांच्या मूर्ती पूजनाच्या सणांना सुरूवात होत असल्याने मूर्तिकारांचे शहरात आगमन झाले आहे. शहरातील सिव्हील लाईन्स परिसरात मोठ्या प्रमाणात दरवर्षी मुर्तिकार आपले बस्तान मांडतात. सध्या तरी एकाच परिवाराचे आगमन झाले असून त्यांनी आतापासूनच मुर्त्या तयार करण्याच्या कामाला सुरूवात केली आहे.कुंभार समाज बांधवाचा परिसर व मुर्तिंसाठी नागपूरची ‘चितारओळ’ प्रसिद्ध आहे. नागपूरवासीय मूर्तिंची तेथूनच खरेदी करतात. असेच काहीशे चित्र येथील सिव्हील लाईन्स परिसरात बघावयास मिळते. सिव्हील लाईन्स परिसरात मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात मूर्तिकार येत असून यंदाही मूर्तिकारांचे आगमन होत आहे. हनुमान चौकापासून या मूर्तिकारांचे परिवार आपले बस्तान मांडून मुर्त्या तयार करतात. त्यानुसार सध्या जवळील ग्राम नागरा-कटंगी निवासी राजकुमार तेलासु आपल्या परिवारासह येथे दाखल झाले आहेत. हिंदू धर्मात देवी-देवतांच्या पूजनासाह मूर्तिपूजेलाही तेवढाच मान आहे. यंदा २ सप्टेंबर रोजी जन्माष्टमी असून मूर्तिपूजनाचे सण सुरू होत आहेत. १३ सप्टेंबरला गणेश चतुर्थी येत असून त्यानंतर नवरात्री, शारदा, भुलाभाई, लक्ष्मीपूजन सारखे सण येतील. त्यामुळे हे मूर्तिकार आतापासूनच गोंदियात आले असून त्यांनी मुर्त्या बनविण्यास सुरूवात केली आहे. मोठ्या संख्येत मूर्तिकार सिव्हील लाईन्स परिसरात येत असून हनुमान चौक ते इंगळे चौक हा परिसर जणू चितारओळ म्हणूनच नावारुपाला आली आहे. इंगळे चौकापुढील परिसरातही काही मूर्तिकार येत असून व्यवसाय करतात. सध्या तरी एकाच परिवाराचे आगमन झाल्याचे दिसून येत आहे. मात्र अन्य मूर्तिकारांनी ते नेहमी राहत असलेल्या जागांच्या मालकांची भेट घेतली असून लवकरच ते राहण्यासाठी येतील.गणरायाची मूर्ती बनविण्यास सुरूवातमूर्तिपूजनाच्या सणांत सर्वप्रथम जन्माष्टमी येते व त्यानंतरच अन्य मूर्तिपूजनाचे सण येतात. येत्या २ सप्टेंबर रोजी जन्माष्टमी येत असल्याने मूर्तिकार कामाला लागले आहेत. सध्या राजकुमार तेलासु गणपतीच्याच मुर्त्या बनविण्यात व्यस्त आहेत. गणपतीचे आॅर्डर जास्त राहत असल्याने ते कामाला लागले आहेत. तर सोबतच कान्होबाच्या मुर्त्या तयार करण्याचे काम सुरू केले आहे.छत्तीसगडच्या मूर्तिकारांचेही आगमनयेथील सिव्हील लाईन्स परिसरात लगतच्या गावांतील मूर्तिकार येत असून आपला व्यवसाय करून निघून जातात. मागील काही वर्षांपासून मात्र त्यांच्यासोबतच लगतच्या छत्तीसगड राज्यातील व चंद्रपूर येथीलही काही मूर्तिकार गोंदियात येवू लागले आहे. त्यामुळे गोंदियाचा सिव्हील लाईन्स परिसर चांगलाच गजबजू लागतो.
मूर्तिकारांचे झाले आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 21:08 IST
येत्या २ सप्टेंबरपासून हिंदू धर्मीयांच्या मूर्ती पूजनाच्या सणांना सुरूवात होत असल्याने मूर्तिकारांचे शहरात आगमन झाले आहे. शहरातील सिव्हील लाईन्स परिसरात मोठ्या प्रमाणात दरवर्षी मुर्तिकार आपले बस्तान मांडतात.
मूर्तिकारांचे झाले आगमन
ठळक मुद्देगोंदियातील चितारओळ गजबजली : मूर्ती तयार करण्यास सुरूवात