सालेकसा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिनी जिल्हा परिषद गोंदियाच्या शिक्षण विभागाने सुरू केलेला गावची शाळा आमची शाळा हा अभियान मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आला. मात्र तिसऱ्या वर्षी थंडबस्त्यात असून कागदोपत्रीच सुरू असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. प्रथम दोन वर्षात शाळांनी क्रमांक प्राप्त करण्यासाठी शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती व गावकरी फार मोठी मेहनत घेत होते. परंतु सत्र २०१४-१५ च्या काळात शिक्षकांचा उत्साह कमी झाल्याचे दिसून येत आहे. हा उपक्रम फक्त कागदोपत्रीच सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यातील १२० जिल्हा परिषदेच्या काही निवडक शाळा सोडल्या तर इतर शाळेत या उपक्रमाची कोणतीही तयारी सुरू असल्याचे दिसत नाही. मधल्या काळात गटशिक्षणाधिकारी पद रिक्त असून प्रभारी पदावर व्ही.यू. पचारे काम करीत होते. आता पूर्ण वेळ गटशिक्षणाधिकारी भोयर पदारूढ झालेले आहे. ते किती प्रमाणात शिक्षकांना क्रियाशील करतात, यावर शाळांची तयारी अवलंबून आहे. या उपक्रमात लोकप्रतिनिधींचाही सहभाग अपेक्षित होता. पण लोकप्रतिनिधीही रुची दाखवित नाहीत. त्यांची आवड आपल्या प्रभागातील शाळा प्रथम आली पाहिजे यासाठी असते. मूल्यांकनात बसत नसतानाही बसवून क्रमांक मिळवून देण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधी करीत असल्याची चर्चा मागे शिक्षक मंडळीत होती. त्यामुळे प्रामाणिक, योग्य काम करणाऱ्या शाळांवर अन्यायही झाल्याचे दिसून येत होते. लोकप्रतिनिधींच्या भेटीवर मूल्यांकनात गुण देण्यात आलेले आहेत. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, गटशिक्षणाधिकारी, सभापती, उपसभापती, खंडविकास अधिकारी केंद्रप्रमुखांच्या भेटीवर, त्रुटी दाखवून दूर करण्यावर गुण देण्यात आलेले आहेत. शाळेतील समस्या बघून त्या दूर करणे यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करायला पाहिजे, पण असे होताना दिसत नाही. त्यामुळे मूल्याकंनात मिळणारे गुण शाळांना मिळत नाही. लोकप्रतिनिधींचाही उत्साह शिक्षकांसारखाच कमी झाल्याचे दिसून येत आहे. शिक्षकांची भूमिका फक्त शाळेत दिवस काढण्यासाठी असते. बिजेपार परिसरातील शिक्षक केव्हाही येतात आणि केव्हाही जातात. त्यांच्यावर केंद्रप्रमुखाचेही नियंत्रण नाही. सोयी-सवलती घेणे, पण जबाबदारी पार न पाडणे, ही शिक्षकांची भूमिका असल्यामुळे गावची शाळा आमची शाळा हा उपक्रम सध्या कागदोपत्रीच दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)
गावची शाळा उपक्रम थंडबस्त्यात
By admin | Updated: December 4, 2014 23:11 IST