गोंदिया : विविध आजार पसरविणाऱ्या डासांची प्रतिकारक्षमता वाढली असून डास वातावरणाशी समरस झाले आहेत. त्यामुळेच डास निर्मूलनासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा प्रभाव कमी होत आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. डास निर्मूलनासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करीत आहे. तरीसुध्दा डासांचा वाढत्या प्रभावाने विविध आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे आढळून येत आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस नाना प्रकारच्या डासांची उत्पत्ती वाढत आहे. त्यामुळे काही रुग्ण उपचाराला साथ मिळू शकत नसल्याने बळी पडत आहेत. ताप, न्युमोमिया, मलेरिया, डेंग्यू यासारखे आजार जिल्हाभरात वाढत आहे. डास निर्मूलनासाठी आरोग्य विभाग तसेच पालिका प्रयत्नरत आहेत. मात्र डासांचा प्रादुर्भाव रोखण्यात आरोग्य विभाग हतबल झाल्याचे दिसून येत आहे. अति उष्ण व थंड वातावरणात डास जगू शकत नाहीत. मात्र काही वर्षांत उष्ण व थंड वातावरणातही डासांचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे. सद्यस्थितीत तिनही ऋतूंमध्ये डास आढळून येत आहेत. त्यातच डेंग्यूसारखे जीवघेणे आजार पसरविणारे एडीस डास वाढत आहेत. डास उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जाते. जनजागृती झाल्याने नागरिकांनी आता स्वच्छतेकडे लक्ष दिले असले तरी डासांमुळे होणारे आजार दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. डॉक्टरांच्या मते डासांच्या प्रतिकारक्षमतेत वाढ झाली आहे. त्यामुळे डासांना मारक ठरणाऱ्या औषधींचा प्रभाव कमी झाला आहे. डास वातावरणाशी समरस झाल्याने तिनही ऋतूंत डास आढळून येत आहेत.डेंग्यू आजार अरबो व्हायरस या विषाणूमुळे होतो. डेंग्यूचा प्रसार एडीस इजिप्त नावाच्या डासापासून होतो. डेंग्यू विषाणूची वाढ साधारण ८ ते १० दिवसांत पूर्ण होते. हा डास मरेपर्यंत दूषित राहून अनेकांना बाधा पोहोचवितो. ४०० मीटरपर्यंत हा डास उडू शकतो. एडीस डासांच्या पायावर पांढरे पट्टे असतात. त्यामुळे त्याला टायगर मास्किटो म्हणतात. प्रवास साधनातून हा डास कुठेही जाऊ शकतो. हे डास दिवसांतच चावतात, स्वच्छ पाण्यात राहतात त्यामुळे याला डे बायटर, राजेसी असेही म्हणतात. एडीज डास रोगकारक व रोगवाहक आहे. डासांना संपविण्यासाठी विविध औषधे वापरली जात आहेत. मात्र रिजल्ट शून्य आहे. (शहर प्रतिनिधी)
डास झाले वातावरणाशी समरस
By admin | Updated: December 25, 2014 23:35 IST