लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : छत्तीसगडमध्ये सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारने धानाला २५०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. तर त्या तुलनेत महाराष्ट्रात प्रती क्विंटल १७४० रुपये हमीभाव मिळत आहे. क्विंटलमागे ८०० रुपयांची तफावत असल्याने काही शेतकरी व व्यापारी छत्तीसगडमध्ये धानाची विक्री करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे.गोंदिया व भंडारा जिल्ह्यात जवळपास ५ लाख हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. तर चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यात सुध्दा धानाचे लागवड क्षेत्र अधिक आहे. या पाचही जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकºयांना मागील तीन चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे.खते, बियाणे, मजुरीच्या खर्चात सातत्याने वाढ होत आहे.धानाच्या शेतीला प्रती एकरी १८ ते २० हजार रुपयांचा खर्च येत आहे. मात्र त्यातुलनेत धानाला हमीभाव नसल्याने धान उत्पादक शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत आहे. केंद्र व राज्य सरकारने मागील चार वर्षांत धानाच्या हमीभावात केवळ २०० रुपयांनी वाढ केली. मात्र लागवड खर्चाच्या तुलनेत हा दर फारच कमी आहे. यंदा महाराष्ट्रात धानाला प्रती क्विंटल १७४० ते १७७० रुपये हमीेभाव दिला जात आहे. तर लगतच्या छत्तीसगड व मध्यप्रदेशात सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारने धानाला प्रती क्विंटल २५०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. त्याचे काही प्रमाणात महाराष्ट्रात सुध्दा परिणाम दिसून येत आहे.गोंदिया जिल्ह्याचा काही भाग छत्तीसगडला लागून असून या भागातील शेतकरी छत्तीसडमधील आपल्या नातेवाईकांच्या सहकार्याने धान विक्री करण्यासाठी नेत आहे. तर काही व्यापारी सुध्दा या संधीचा फायदा घेत असून प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्रातून दररोज सात आठ ट्रक धान छत्तीसगडमध्ये विक्रीसाठी जात असल्याची माहिती आहे. यासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाºयांना विचारणा केली असता काही प्रमाणात धान छत्तीसगडमध्ये विक्रीसाठी जात असल्याचे सांगितले.आठ लाख क्विंटल धान खरेदीजिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर आत्तापर्यंत ८ लाख १२ हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. खरेदी केलेल्या धानाची एकूण किमत १३६ कोटी रुपये असून आत्तापर्यंत ९६ कोटी रुपयांचे चुकारे करण्यात आले आहे. यंदा १५ लाख क्विंटल धान खरेदी होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.शेतकºयांमध्ये असंतोषलगतच्या छत्तीसगडमध्ये धानाला प्रती क्विंटल २५०० रुपये हमीभाव मिळत आहे. मात्र महाराष्ट्रात अद्यापही १७०० रुपये हमीभावावर शेतकऱ्यांची बोळवण केली जात आहे. लागवड खर्चातील वाढीमुळे शेतकरी कर्जबाजारी होत असताना सरकारकडून त्याची दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे.अद्यापही बोनसची घोषणा नाहीशासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाºया शेतकऱ्यांना दरवर्षी प्रती क्विंटल बोनस जाहीर केले जात.मात्र धान खरेदीला सुरूवात होवून तीन महिन्याचा कालावधी लोटला. पण अद्यापही सरकारने बोनसची घोषणा केली नाही. त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत.
महाराष्ट्रातील धानाची छत्तीसगडमध्ये विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 00:44 IST
छत्तीसगडमध्ये सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारने धानाला २५०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. तर त्या तुलनेत महाराष्ट्रात प्रती क्विंटल १७४० रुपये हमीभाव मिळत आहे. क्विंटलमागे ८०० रुपयांची तफावत असल्याने काही शेतकरी व व्यापारी छत्तीसगडमध्ये धानाची विक्री करीत आहे.
महाराष्ट्रातील धानाची छत्तीसगडमध्ये विक्री
ठळक मुद्देहमीभावात तफावत : दररोज आठ ते दहा ट्रक धानाची वाहतूक, जिल्ह्यात हमीभावाअभावी नाराजीचा सूर