गोंदिया : जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आला असून, बाधितांची संख्या आटोक्यात असल्याने जिल्ह्यातील काही तालुका कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत आहेत. अशात सालेकसा तालुक्यातील क्रियाशील रुग्णांची सुटी झाल्याने तेथे एकही क्रियाशील रुग्ण उरला नाही. यामुळे आता सालेकसा तालुका कोरोनामुक्त झाला आहे.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या सध्या चांगलीच आटोक्यात आली आहे. यामुळे जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. गुरुवारची (दि. ४) आकडेवारी बघितल्यास जिल्ह्यात १०३ क्रियाशील रुग्ण होते. म्हणजेच, कोरोनाचा जिल्ह्यातून परतीचा प्रवास सुरू झाल्याचे दिसत आहे. त्यातही दिलासादायक बाब म्हणजे, जिल्ह्यात सध्या बोटांवर मोजण्याइतकेच बाधित दररोज नोंदविले जात आहेत. त्यात कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ९६.७६ टक्के असल्याने झपाट्याने क्रियाशील रुग्णांची संख्या खालावली आहे. विशेष म्हणजे, गुरुवारी जिल्ह्यात १० नवीन बाधितांची भर पडली असतानाच ९ बाधितांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. सुटी देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये २ रुग्ण सालेकसा तालुक्यातील होते व त्यांचीही सुटी झाल्याने आता सालेकसा तालुक्यात एकही क्रियाशील रुग्ण शिल्लक नसून, सालेकसा तालुका ग्रीन झाला आहे.
----------------------------
आणखी ५ तालुके कोरोनामुक्तीकडे
जिल्ह्यातील सालेकसा तालुका कोरोनामुक्त झाला असतानाच त्यापाठोपाठ तिरोडा, गोरेगाव, सडक-अर्जुनी, अर्जुनी-मोरगाव व देवरी तालुकाही कोरोनीमुक्तीकडे वाटचाल करीत आहे. कारण, तिरोडा तालुक्यात आता ८, गोरेगाव ४, देवरी ३, सडक-अर्जुनी १ तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यात फक्त ४ रुग्ण क्रियाशील आहेत. यामुळे आता लवकरच हे तालुकेही कोरोनामुक्त होऊन अवघा जिल्ह्याच कोरोनामुक्त व्हावा, याची जिल्हावासीय वाट बघत आहेत.