मुंडीकोटा : जवळचे बिरोला हे गाव वैनगंगा नदीच्या काठावर असून या घाटाचा लिलाव तिरोडा महसूल विभागाने केला होता. या घाटाचे कंत्राट गोंदियातील एका कंत्राटदाराला देण्यात आले होते. पण आता पावसाळा सुरू असूनही हे घाट सुरू असल्यामुळे रात्रंदिवस रेतीने भरलेल्या अवजड वाहनांची ये-जा सुरू आहे. त्यामुळे रस्ते जर्जर झाले आहेत.या घाटावरून दिवसरात्र ओव्हरलोड रेतीचे ट्रक भरून सरळ नागपूरकडे जातात. त्यामुळे रस्त्याचे बेहाल झाले आहेत. हे ट्रक बिरोली, चांदोरी, घाटकुरोडा, घोगरा, देव्हाडा (एलोरा पेपर मिल) या रस्त्यांनी जावून सरळ देव्हाडा मार्गावरून नागपूरकडे धावतात. त्यामुळे या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याचे दिसत आहेत. खड्ड्यांत पावसाचे पाणी साचून राहते. या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना ट्रक जाताना खड्ड्यातील पाणी उडून अनेकांचे कपडे खराब होतात. देव्हाडा या गावी एलोरा पेपर मिल असून त्यात शेकडो कामगार काम करतात. रस्त्याच्या जीर्ण अवस्थेमुळे दुचाकी वाहन तसेच चारचाकी हलके वाहन चालविताना अनेकांना कमालीचा त्रास होतो. दोन वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. पण यावेळी डांबर व मुरूमाचा पत्ताच नाही. रस्त्यावर केवळ गिट्टी उखडून पडलेली दिसत आहे. त्यामुळे हे रस्ते अपघातांना आमंत्रण देणारी ठरत आहेत. याच रस्त्यांवरून शालेय विद्यार्थ्यांसाठी तिरोडा आगाराची स्कूल बस सुरू करण्यात आली आहे. ती बस घोगरा गावापर्यंत येवून सरळ घाटकुरोडा मार्गे तिरोड्याला परतते. पण ही बस रस्त्यांच्या दयनिय अवस्थेमुळे बंद होण्याच्या मार्गावर आहे. सी बससेवा बंद झाल्यास अनेक विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून वंचित राहण्याची पाळी येईल. या रस्त्यांच्या जीर्णावस्थेकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे रस्ते ये-जा करण्यास अयोग्य ठरत आहेत.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या रस्त्यांची पाहणी करून रस्ते दुरूस्तीबाबत त्वरीत कार्यवाही करणे गरजे झाले आहे. रस्ते दुरूस्तीची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)
बिरोली रेतीघाटामुळे रस्ते होत आहेत जर्जर
By admin | Updated: August 1, 2014 00:21 IST