गोंदिया : अनेक कारणांनी नेहमीच वादग्रस्त राहणाऱ्या नगर पालिकेने अनेक वर्षांनी गोंदियात रस्ते दुरूस्तीचे काम हात घेतले. परंतू पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाखातर घाईगडबड करून ही कामे आटोपली जात असल्यामुळे कामाचा दर्जा खूपच खालावला आहे. गेल्या दोन महिन्यात अडीच कोटींची कामे पूर्णत्वास गेली. परंतू ते रस्ते पाण्याने वाहून जात असल्यामुळे त्या रस्त्यांवर खर्च झालेले अडीच कोटी रुपये पाण्यात वाहून गेले आहेत.गोंदिया शहरात गेल्या दोन वर्षांपासून विस्तारित नळ योजनेसाठी जुनी पाईपलाईन बदलून नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात असले तरी मुख्य मार्गासह अनेक ठिकाणी रस्त्यावर आडवे खोदकाम करून पाईपलाईन टाकावी लागत आहे. त्यामुळे हे काम संपल्याशिवाय नवीन रस्त्यांच्या कामांना सुरूवात करू नये अशी नगर परिषदेच्या बांधकाम विभागातील अभियंत्यांची सूचना होती. कारण एकदा डांबरीकरण झालेले रस्ते पाईपलाईनसाठी खोदल्यानंतर पुन्हा त्यावर कितीही भर घातली तरी त्याची दबाई होण्यास वेळ लागते. त्यामुळे पुन्हा रस्ते खराब होण्याची शक्यता असते, ही बाब अभियंत्यांनी स्पष्ट केली.परंतू कामे वाटण्याची घाई झालेल्या नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी तांत्रिक बाबी विचारात न घेता रस्त्यांची कामे तातडीने सुरू करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या.जवळपास ७ कोटींच्या १३१ कामांसाठी वेगवेगळ्या निविदा काढून कामांची खिरापत वाटपण्यात आली. यात झालेल्या कमिशनबाजीमुळे आधीच कामांचा दर्जा खालावला आहे. त्यातच पाईपलाईनच्या खोदकामामुळे रस्ते पुन्हा जैसे थे होत आहेत. यामुळे गोंदिया शहर गलिच्छ रस्ते आणि कचऱ्यासाठी नंबर १ ठरत आहे. ऐन पावसाळ्यात अनेक ठिकाणी डांबरीकरणाची कामे सुरू आहेत. त्यामुळे हे रस्ते किती दिवस टिकणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
गोंदियातील अडीच कोटींचे रस्ते गेले पाण्यात वाहून
By admin | Updated: August 1, 2014 00:20 IST