गोंदिया : महावितरणच्या भरारी पथकाने गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथे असलेल्या शाम राईस मिलची ३७ लाख ९२ हजाराची वीजचोरी उघडकिस आली. या राईस मिलचे मालक शिवकुमार महाविरप्रसाद अग्रवाल यांनी सकृतदर्शनी ३ लाख २६ हजार ६६७ युनीट्सची वीजचोरी केल्याचे समोर आले आहे. त्यांच्याविरोधात महावितरणच्या नागपूर पोलीस स्टेशनमध्ये वीजकायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये वीजचोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर वीजचोरीसाठी त्यांच्यावर १५ लाख ३० हजाराचा दंडही आकारण्यात आला आहे. वीजचोरी विरोधात राबविलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत उपसंचालक दक्षता अंमलबजावणी व सुरक्षा कक्ष सुमित कुमार यांच्या मार्गदर्शनात महावितरणच्या वाशिम भरारी पथका व्दारा ही कारवाई करण्यात आली. शिवकुमार महाविरप्रसाद अग्रवाल यांनी त्यांच्या सदर राईस मिलला डी.टी.सी. क्रमांक ४८११३०५ वरून वीज पुरवठा घेतला होता. त्यांनी या वीजपुरवठ्यास, मीटर बायपास करत (वीजपुरवठा मीटरच्या माध्यमातून न वापरता) राईस मीलला वेगळ्या विजेच्या तारेने थेट जोडून अनधिकृतपणे व चोरून वीज वापर सुरू केला होता. वाशिम भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता डी.एम. फुलझेले यांनी शनिवार, १७ जानेवारी रोजी सदर राईस मिलचा वीजपुरवठा तपासला असता त्यांना ही वीजचोरी लक्षात आली. या मोहीमेत अतिरीक्त कार्यकारी अभियंता डी.एम.फुलझेले यांच्या सोबत वाशिम भरारी पथक, तसेच सडक-अर्जुनी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता अजय दखने व सौंदडचे कनिष्ठ अभियंता प्रणव बडोले यांनी सहभाग घेतला. (जिल्हा प्रतिनिधी)
सौंदडच्या शाम राईस मिलकडून
By admin | Updated: January 22, 2015 01:31 IST