गोंदिया : रेतीची अवैध वाहतूक करताना पकडून आल्याने निलंबित करण्यात आलेले ट्रॅक्टर परवाने पुन्हा बहाल करण्याबाबत रेती व्यवसायी ट्रॅक्टर मालकांच्या प्रतिनिधींनी माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांची भेट घेऊन मागणी केली. यावर अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांच्याशी चर्चा केली आहे.
अग्रवाल यांनी, रेतीची अवैध वाहतूक अयोग्य आहे मात्र रेती घाटांचा लिलाव न झाल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. कोरोना काळातही रेती व्यवसायातून शेकडो परिवार आपले जीवनयापन करीत आहे. आता रेती घाटांचा लिलाव असूनही ट्रॅक्टरची कमतरता असल्यामुळे रेतीचे दर अपेक्षेप्रमाणे कमी झालेले नाही. याचा सर्वसामान्यांचा फटका बसत आहे. कित्येक ट्रॅक्टर मागील एक ते दीड महिन्यांपासून बंद आहेत. परिणामी अशांवर उपासमारीची पाळी आली आहे. तर रेती घाटांचा लिलाव होऊनही आता काम असताना ट्रॅक्टर जप्त असल्याने ट्रॅक्टर मालक अडचणीत आले आहेत. करिता निलंबित करण्यात आलेल्या ट्रॅक्टरचे परवाने पुन्हा बहाल करण्याची मागणी केली. यावर जिल्हाधिकारी मीना यांनी पुढील आठवड्यात याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.