जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन : जातीय सलोखा समितीची बैठक भंडारा : जिल्ह्याचा विकास चांगल्या प्रकारे होण्यासाठी नागरिकांनी सर्वधर्माचा आदर करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले. जातीय सलोखा समितीच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके, मुख्य कार्यपालन अधिकारी राजेन्द्र निंबाळकर, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महाजन, उपविभागीय अधिकारी डॉ.संपत खिलारी, तहसिलदार सुशांत बनसोडे, भंडारा पालिकेचे मुख्याधिकारी रविंद्र देवतळे, तुमसरचे मुख्याधिकारी सातपुते उपस्थित होते. मुस्लीम बांधवाना रमजान ईदच्या शुभेच्छा देऊन जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्हा लहान असला तरीही नागरिक जास्तीत जास्त संख्येने बैठकीला उपस्थित राहतात. यावरुन जागरुक नागरिक असल्याचे दिसते. समितीच्या सदस्यांनी केलेल्या सूचनेनुसार शहरातील पार्कींगची समस्या लवकरच सोडविण्यात येईल. जिल्ह्याला चांगल्या मार्गाने नेण्यासाठी नागरिकांनी मानवतेच्या मार्गाचा विचार करावा. देशाला नवीन ऊर्जेची व विकासाची गरज आहे. देशाचा व जिल्ह्याचा विकास होण्यासाठी सर्वधर्मसमभावाची आवश्यकता आहे, त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. ई-गर्व्हनर तसेच व्हॉट्सअपचा उपयोग चांगल्या प्रकारे करावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी संयमी व शांततेने सर्व सण चांगले करावे. जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यास नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.याप्रसंगी ईश्वरलाल काबरा यांनी शितला माता मंदीर मार्गावरील रहदारी दुर्गोत्सवाच्या वेळी बंद करावी. पालिकेने रस्त्याच्या जागेची स्वच्छता ठेवावे, अशा सूचना केल्या. अब्दुल आकबानी यांनी आपसी सामंजस्याने समस्या सोडविल्या पाहिजेत. विघ्नसंतोषी लोकांवर अंकुश लावले तरच अनुचित प्रकार घडणार नाही. कायदा हातात न घेता पोलीसांना सहकार्य करावे, असे सांगितले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वसंत एंचिलवार यांनी मत मांडले. प्रास्ताविकातून अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी जातीय सलोखा समितीची भूमिका विषद केली. संचालन पोलीस निरिक्षक प्रशांत कोलवटकर यांनी केले. आभारप्रदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी हिम्मत जाधव यांनी केले. बैठकीला शांतता समितीचे सदस्य, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
सर्व धर्माचा आदर करा
By admin | Updated: July 18, 2015 01:16 IST