कपिल केकत - गोंदियाघनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी नगर परिषदेसह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना पसंत आलेल्या रापेवाडातील जागेत मात्र जलाशयाची आडकाठी येत आहे. या जागेवर जलाशय प्रस्तावित असल्याने पालिकेचे पुन्हा एकदा टेंशन वाढले आहे. मात्र प्रकल्पासाठी जागा अत्यंत उपयुक्त असल्याने पालिकेने या जागेच्या सविस्तर अहवालासाठएी लघुपाटबंधारे उपविभागीय अभियंत्यांकडे मागणी केली आहे. त्यामुळे सध्यातरी नगर परिषद प्रशासनाची या जागेवरून धाकधुक सुरू आहे.शहरात निघणाऱ्या घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी नगर परिषदेकडे व्यवस्थापन प्रकल्प असणे गरजेचे आहे. यावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत एक समिती कार्यरत असून विद्यमान जिल्हाधिकारी या प्रकल्पासाठी गंभीर दिसून येत आहे. कटंगी येथील जागेला विमान प्राधीकरण नियमानुसार परवानगी देता येणार नाही असे विमान प्राधीकरणच्या अधिकाऱ्यांनी समितीच्या बैठकीत स्पष्ट केले होते. शिवाय अन्य काही कारणांमुळे ही जागा प्रकल्पासाठी उपयुक्त नसल्याचे निर्दशनास आले होते.समितीतील या चर्चेनंतर जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुमंत मोरे यांना प्रकल्पासाठी अन्य जागा शोधण्याचे निर्देश दिले. त्यानुसार नगर परिषदेने जवळील ग्राम रापेवाडा येथील गट क्रमांक ६४३ मधील झुडूपी जंगलाची आराजी ३५.१९ हेक्टर जागा बघितली होती. त्या जागेतील सुमारे ४ हेक्टर जागा प्रकल्पाला मिळावी यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू असून यासंबंधात कार्यवाही सुरू होती. अशातच नगर परिषद अध्यक्ष कशिश जायस्वाल, उपविभागीय अधिकारी के.एन.के. राव, तहसीलदार संजय पवार, नगर परिषद मुख्याधिकारी सुमंत मोरे व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपविभागीय अधिकारी भड यांनी २ डिसेंबर रोजी रापेवाडा येथे बघून ठेवलेल्या जागेची पाहणी केली. प्रकल्पाच्या दृष्टीने ही जागा सर्वांनाच आवडल्याने ३ डिसेंबर रोजी नगर रचना सहायक संचालक श्रीमती थूल यांनीही तहसीलदार संजय पवार, नगर परिषद मुख्याधिकारी सुमंत मोरे, नगर रचना विभागातील सलाम कुरेशी व अन्य अधिकाऱ्यांसह जागेची पाहणी केली. एवढेच नव्हे तर नगर परिषदेला आवश्यक एवढ्या जागेची मोजणी सुद्धा करविली. मात्र या दरम्यान सदर जागेवर एक जलाशय प्रस्तावित असल्याची माहिती पालिकेच्या हाती लागली. त्यामुळे ही जागा हातून गेल्यास पुन्हा दुसऱ्या जागेसाठी धावपळ करावी लागणार असल्याचे पालिका प्रशासनाचे टेंशन वाढले आहे. ही जागा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असल्याने सर्वांचे लक्ष या जागेकडे लागले आहे. प्रस्तावित जलाशयापासून ५०० मीटर अंतरावर पालिकेला प्रकल्पासाठी जागा हवी आहे. अशात या जागेबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पालिकेने लघुपाटबंधारे विभागाकडे अर्ज करून जागेचा सविस्तर अहवाल मागितला आहे.
रापेवाडातील जागेवर जलाशयाची आडकाठी
By admin | Updated: December 9, 2014 22:52 IST