गोंदिया : जिल्हा परिषदेच्या ५३ जागांसह गोरेगाव पंचायत समितीच्या सर्व जागांचे आरक्षण पुन्हा बदलणार आहे. दुसऱ्या सोडतीनंतर अनेकांनी त्यावर आक्षेप घेतल्यानंतर तिसऱ्यांदा आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आला. शनिवारी २ मे रोजी ही सोडत काढली जाणार आहे.अवघ्या दोन-अडीच महिन्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी ४ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात व तहसील कार्यालयात दुसऱ्यांदा आरक्षण सोडत काढण्यात आली होती. परंतु त्यावर ४८ आक्षेप आले. तिसऱ्यांदा सोडत काढली जाणार असल्याने पुन्हा संभाव्य उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे.या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच ५० टक्के महिलांना आरक्षण असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलाराज दिसणार आहे. ४ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात ५३ जिल्हा परिषद क्षेत्राचे व १०६ पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर करण्यात आले होते. या आरक्षणासाठी १७ एप्रिलपर्यंत आक्षेपाची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार ४८ आक्षेप प्रशासनाला प्राप्त झाले. यात जिल्हा परिषद क्षेत्रासाठी १३ तर पंचायत समिती गणांसाठी ३५ आक्षेपांचा समावेश होता. या सर्व आक्षेपांची सुनावणी २३ एप्रिल रोजी करण्यात आली. त्यानुसार गोरेगाव वगळता अन्य तालुक्यातील पंचायत समितीचे आक्षेप मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे या ठिकाणी जुनेच आरक्षण कायम राहणार आहे. गोरेगाव पंचायत समितीत एक आक्षेप कायम राहिल्याने या तालुक्यातील गणांच्या आरक्षणाची घोषणा नव्याने २ मे रोजी करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद क्षेत्रासाठी १३ आक्षेप असल्याने संपूर्ण ५३ जि.प. क्षेत्राच्या आरक्षणाचीही नव्याने घोषणा करण्यात येणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)आरक्षणाला आक्षेपांचे ग्रहणयापूर्वी २ वेळा जिल्हा परिषद क्षेत्र व पंचायत समिती गणांच्या आरक्षणाची घोषणा करण्यात आली होती. परंतु पहिल्या घोषणेनंतर सहा तालुक्यांना नगर पंचायतीचा दर्जा देण्याची अधिसूचना निघाल्याने पहिले आरक्षण रद्द झाले. त्यानंतर नव्याने जिल्हा परिषद क्षेत्र व पंचायत समिती गणांची रचना करुन नवे आरक्षण ४ एप्रिल रोजी घोषित करण्यात आले होते. या आरक्षणालाही आक्षेपाचे ग्रहण लागल्याने आता तिसऱ्यांदा २ मे रोजी आरक्षण काढण्याचा निर्णय घेण्यात आला. आरक्षणात वारंवार होत असलेल्या या बदलामुळे इच्छुक उमेदवारांचा जीव वरखाली होत आहे. आरक्षण निश्चित न झाल्याने आपले क्षेत्र निवडणे संभाव्य उमेदवारांसाठी कठीण जात आहे. ४ एप्रिल रोजी झालेल्या घोषणेनंतर काही उमेदवारांनी संभाव्य क्षेत्र निवडून त्या दृष्टीने निवडणुकीची तयारी करणे सुरु केले होते. मात्र आक्षेपामुळे या उमेदवारांचे मनसुबे उधळल्या गेले आहेत. त्यामुळे आता संभाव्य उमेदवारांच्या नजरा २ मे रोजी काढल्या जाणाऱ्या आरक्षणाकडे लागल्या आहेत.
पुन्हा बदलणार आरक्षण
By admin | Updated: May 1, 2015 00:02 IST