लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सध्या सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने थोडा दिलासासुद्धा मिळाला आहे. जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून कोरोनाबाधितांपेक्षा मात करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने कोरोनावर मात करणाऱ्यांची घोडदौड कायम असल्याचे समाधानकारक चित्र आहे. जिल्ह्यात शनिवारी (दि. २४) ६६३ बाधितांनी कोरोनावर मात केली, तर ५८३ नवीन रुग्णांची नोंद झाली. २१ रुग्णांचा उपचारांदरम्यान शासकीय आणि खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. शनिवारी आढळलेल्या ५८३ बाधितांमध्ये सर्वाधिक २७३ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा ६४, गोरेगाव ३७, आमगाव ६६, सालेकसा १२, देवरी ७३, सडक अर्जुनी ३८, अर्जुनी मोरगाव १८ आणि बाहेरील दोन रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाचा संसर्ग शहरीभागासह ग्रामीण भागातसुद्धा वाढत आहे. त्यामुळे कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्या आहे. ग्रामीण भागात गावागावांत चाचण्यांवर भर दिला जात असून, यात अनेक नवीन रुग्ण आढळून येत आहे, तर ६६ कंटेन्मेंट झोनमध्ये एकूण १०७४ रुग्ण आहे. सध्या सर्वाधिक कंटेन्मेंट झोन गोंदिया तालुक्यात आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या अनुषंगाने आतापर्यंत १२९५४३ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले आहे. त्यापैकी १०५६८७ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजेन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत आतापर्यंत १२६२४३ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १०९९८६ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २९६३३ काेरोना बाधित आढळले असून, यापैकी २२६४२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ६५३७ काेरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, तर ५१३६ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
औषधांचा तुटवडा कायमजिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने कोरोनावरील औषधांची मागणी वाढली आहे. मात्र, त्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने कोरोनावरील प्रतिबंधात्मक औषधांचा तुटवडा कायम आहे.
मृत्यूचे सत्र कायम असल्याने चिंता कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढल्याने जिल्ह्यात दिलासादायक चित्र आहे. मात्र, दुसरीकडे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे सत्र कायम असल्याने जिल्हावासीयांची चिंता कायम आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून दररोज २० बाधितांचा मृत्यू होत आहे. सर्वाधिक मृत्यू हे शासकीय रुग्णालयात झाले आहेत. रॅट कीटची समस्या कायम कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने कोरोना चाचण्या करण्यासाठी नागरिक पुढे येत आहे. मात्र, जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचण्या करण्यासाठी रॅट कीटचा तुटवडा निर्माण झाला आहे. प्रत्येक केंद्राला केवळ ४० कीट दिल्या जात आहे. त्यामुळे एका केंद्रावर सध्या ४० चाचण्या होत आहेत.