लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सालेकसा तालुक्यातील झालिया येथील एका ५५ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शुक्रवारी (दि.१८) मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा आकडा आता ५७७ वर पोहोचला आहे. तब्बल सहा महिन्यांच्या कालावधीनंतर कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाचा धोका अद्यापही टळलेला नसून जिल्हावासीयांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात शुक्रवारी एका रुग्णाने कोरोनावर मात केली तर एका कोरोनाबाधिताची भर पडली. त्यामुळे कोरोना ॲक्टिव्ह रुग्णाची संख्या ३ वर पोहचली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून, कोरोनामुक्तीच्या दिशेने जिल्ह्याची वाटचाल सुरू होती. मात्र, मागील पंधरा दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत थोडी वाढ होत आहे. जिल्ह्यात मागील सहा महिन्यांत कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता. जून महिन्यात १ बाधिताचा मृत्यू झाला होता. त्यानंतर बाधित आणि मृतकांची संख्यासुद्धा निरंक होती. मात्र, शुक्रवारी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सालेकसा तालुक्यातील झालिया येथील एका ५५ वर्षीय कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा आकडा ५७७ वर पोहचला आहे. शुक्रवारी उपचार घेत असलेल्या एका बाधिताने कोरोनावर मात केली तर आमगाव तालुक्यात एका कोरोनाबाधिताची नोंद झाली. त्यामुळे कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ३ वर पोहोचली आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शुक्रवारी एकूण २६६ चाचण्या करण्यात आल्या. यात २२० आरटीपीसीआर तर ४६ जणांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात १ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला.
नियमांचे करा काटेकोरपणे पालन - कोरोनाचा धोका अद्यापही टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे, अन्यथा पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.