बोंडगावदेवी : निकोप व कीटकनाशक विरहित शेती शेतकऱ्यांना फायदेशीर आहे. सेंद्रिय शेतीची कास धरल्याशिवाय जमिनीच्या व मानवी आरोग्यात सुधारणा शक्य नाही. जमिनीची सुपीकता खालावली आहे. विविध रासायनिक खते व कीटकनाशके औषधांच्या सततच्या वापरामुळे शेतीची सुपीकता कमी झाली. जमिनीची भूक भागवून सुपीकता कायम ठेवण्यासाठी सेंद्रिय शेतीची कास धरणे काळाची गरज आहे. सेंद्रिय शेती शेतकऱ्यांसाठी एक आशेच्या किरणासह वरदान असल्याचे प्रतिपादन नावीन्यपूर्ण प्रयोगशील शेतकरी देवेंद्र राऊत यांनी केले.
तालुक्यातील आसोली येथे आयोजित केलेल्या शेतकरी प्रशिक्षणात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने शाश्वत शेती अभियान २०२०-२१ जमीन आरोग्य पत्रिका अंतर्गत आसोली येथे आयोजित शेतकरी प्रशिक्षणा प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून यादवराव मसराम, ललीत सोनवाने, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे, मंडळ कृषी अधिकारी सुधीर वरकडे, कृषी पर्यवेक्षक नरेश बोरकर, दुधराम नाकाडे, भिवा नाकाडे, दयाराम काळसर्पे उपस्थित होते. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना देवेंद्र राऊत म्हणाले, सेंद्रिय खत, शेण खत, जैविक, हिरवळी खत, जोर खते वापरूनच जमिनीचे आरोग्य पूर्ववत करू शकतो. जमिनीचे आरोग्य सांभाळणे काळाजी गरज आहे. रासायनिक खतांचा वापर सुरू राहिला तर जमिनीची सुपीकता मृतप्राय झाल्याशिवाय राहणार नाही. ललीत सोनवाणे म्हणाले, फळबाग, अद्रक, प्लास्टिक मल्चिंग, सूक्ष्म सिंचन यावर त्यांनी सविस्तर माहिती दिली. भाताची शेती आजघडीला तोट्याची झाली आहे. पाण्याची उपलब्धता असूनसुद्धा केवळ भातपिकाचेच उत्पादन घेतले जाते. हे चित्र बदलण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे. ऊस, केळी, मका, भाजीपाला या नगदी पिकांकडे शेतकऱ्यांनी वळले पाहिजे. महिलांनी शेतीपूरक व्यवसाय करून घर संसारास हातभार लावण्यासाठी पुढे यावे. मंडळ कृषी अधिकारी वरकडे यांनी शेतकऱ्यांनी नगदी पिकाकडे वळल्याशिवाय शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साध्य होणार नाही, असे सांगितले. तालुका कृषी अधिकारी रवींद्र लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वनाथ कवासे, चिंतामण मसराम, रजनिश मेश्राम, प्रमोद खोटेले, संध्या बडोले यांनीसुद्धा शेतीविषयक मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाचे संचालन पंकज सूर्यवंशी यांनी केले तर आभार भारती येणे यांनी मानले.