गोंदिया : गोंदिया व तिरोडा या दोन्ही शहरांचे व्यापारी संबंध पाहता या रस्त्यावर सतत रहदारी सुरू असते. शिवाय अनेक ठिकाणी सदर रस्ता नागमोडी वळणे घेत पुढे जाते. या मार्गावर जवळपास १० ते १२ नाले पडतात. मात्र या नाल्यांच्या पुलांवरील दोन्ही बाजूंच्या रेलिंग अनेक दिवसांपासून बेपत्ता आहेत. त्यामुळे एखाद्यावेळी अपघात घडल्यास वाहन सरळ नाल्यांत आठ ते दहा फूट खोलात पडल्याशिवाय राहणार नाही.गोंदिया हे जिल्ह्याचे ठिकाण असून येथे मोठी बाजारपेठ आहे. तर तिरोडा हे उपजिल्ह्याचे ठिकाण असून येथे अदानी पॉवर प्लाँट आहे. दोन्ही शहरांत जुणे व्यापारी संबंध आहेत. त्यामुळे चारचाकी वाहनांची सततची वर्दळ या मार्गावर दिसून येते. शिवाय लांब पल्ल्यांचे ट्रक या मार्गावरून सतत ये-जा करतात. तिरोड्यावरून गोंदियाला व गोंदियावरून तिरोड्याला दुचाकीने येणाऱ्यांची संख्यासुद्धा काही कमी नाही. आणि हा नागमोडी रस्ता ‘ना रॅलिंग, ना रिफ्लेक्टर’ असा आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात घडतात. सदर मार्गावरील दांडेगाव ते गंगाझरी, गंगाझरी ते किंडगीपार व डोंगरगाव या दरम्यान जवळपास सहा नाले पडतात. या नाल्यांवर अनेक वर्षांपूर्वीच पूल तयार करण्यात आले होते. त्याचवेळी पुलांवर दोन्ही बाजूला रेलिंगसुद्धा घालण्यात आले होते. मात्र आता यापैकी एकाही नाल्याच्या पुलावर रेलिंग नाही. नाल्याचा पृष्ठभाग ते नाल्याची खाली जागा जवळपास १० ते १२ फूट उंचीची आहे. अचानक समोरून वाहन आल्यावर किंवा एखाद्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात रेलिंग नसल्यामुळे वाहन सरळ पुलावरून नाल्याच्या खाली कोसळू शकतो. त्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येवू शकत नाही. या मार्गावर गंगाझरी ते किंडगीपार व डोंगरगाव दरम्यान सहा नाले आहेत. त्यांची खोली इतर नाल्यांच्या तुलनेत थोडी अधिक असून त्यात अद्यापही पाणी साचल्याचे दिसून येते. मात्र या नाल्यांच्या पुलावरील रेलिंग पूर्णत: बेपत्ता आहे. शिवाय हे नाले नागमोडी वळणांवरच आहेत. त्यामुळे वेगात असलेले वाहन चालकाने जर वळविण्याचा प्रयत्न केला किंवा एखाद्या वेळी दोन मोठी वाहने आमोरासमोर आली तर एखादा वाहन नाल्यात खाली कोसळण्याचीच शक्यता अधिक. असा प्रसंग ओढवण्याची शक्यता दुचाकी व हलक्या चारचाकी वाहनांची अधिक असते. आणि जड वाहनाचा एखादा चाक जरी रेलिंग अभावी नाल्याच्या पुलावरून खाली गेला तर तो उलटून मोठ्या अपघाताचीच दाट शक्यता आहे. (प्रतिनिधी)
तिरोडा मार्गाच्या नाल्यांवरील कठडे बेपत्ता
By admin | Updated: December 4, 2014 23:10 IST