बोंडगावदेवी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व एस.एस.जे. महाविद्यालय अर्जुनी मोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना शिबिर घेण्यात आला. याप्रसंगी ‘ग्रामोन्नतीकरिता युवा शक्ती’ या संकल्पनेवर भर देवून शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेतून गावातील नाल्यावर बंधारा बांधून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ याचा प्रत्यय ग्रामस्थांना आणून दिला.श्रममूल्य प्रतिष्ठेद्वारे सामाजिक जाणीव निर्माण करण्याची जबाबदारी स्वीकारुन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाद्वारे बोंडगावदेवीमध्ये ७ दिवसीय राज्यस्तरीय शिबिराचे आयोजन केले आहे. ग्रामीण भागातील समस्या यथावकास दूर करण्याचा प्रयत्न रासेयो पथकाद्वारे केला जात आहे. गावाजवळ लागूनच असलेल्या विहीरगाव रस्त्यावरील वाहत्या नाल्याला अडवून बंधारा बांधण्याचा उपक्रम रासेयोच्या स्वयंसेवकांनी केला. रासेयोचा २५ ते ३० विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या एक पथकाने स्वत: अंगमेहनतीचे दर्शन घडवून ३०० खाली पोतींमध्ये माती भरुन पाणी अडवून बंधारा पूर्णपणे बांधला. नाल्याजवळील शेतीला निश्चितपणे फायदा होणार आहे. भात पिकासाठी व इतर पिकांचे उत्पादन घेण्यासाठी या साठवन बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग होणार आहे. सदर बंधाऱ्याजवळील संपूर्ण कचरा साफ करण्यात आला. गावातील महिलांना कपडे धुण्याचा घाटसुद्धा विद्यार्थ्यांनी तयार करुन दिला. एकंदरित राज्यव्यापी रासेयो पथकाने गावात घाम गाळून स्वत: तिकास, पावडा, घमेला हातात धरुन वाहत्या पाण्याला अडवून ३०० पोतींच्या उपयोगाने बंधारा निर्माण करुन जलयुक्त शिवाराची प्रचिती ग्रामस्थांना करुन दिली. रासेयोचे शिबिर प्रमुख डॉ. राजेंद्र चांडक, डॉ. शरद मेश्राम, प्रा. आशिष कावळे यांच्या मार्गदर्शनातून काम केले जात आहे. बंधारा निर्मितीच्या वेळी ग्रा.पं. सदस्य दिनेश फुल्लुके, साधू मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते. (वार्ताहर)
रासेयो शिबिरार्थ्यांनी बांधला बंधारा
By admin | Updated: January 13, 2017 01:07 IST