गोंदिया :गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी शनिवारी (दि.१९) निवडणूक पार पडली. यात सहकार पॅनलचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ. राजेंद्र जैन हे सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवडून आले. उपाध्यक्षपदी सहकार पॅनलचे माजी आ. भैरसिंग नागपूरे तर सचिवपदी अजय हलमारे यांची निवड करण्यात आली. या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचा एक संचालक फुटल्याने या पॅनलला पुन्हा सुंरुग लागला.
जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिवपदासाठी शनिवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. दुपारी १ वाजता नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली. सहकार पॅनलकडून अध्यक्षपदासाठी माजी आ. राजेंद्र जैन, उपाध्यक्षपदासाठी माजी आ. भैरसिंग नागपूरे आणि सचिवपदासाठी अजय हलमारे यांनी तर परिवर्तन पॅनलकडून अध्यक्षपदासाठी जितू कटरे, उपाध्यक्षपदासाठी गप्पू गुप्ता तर सचिवपदासाठी गंगाधर परशुरामकर यांनी अर्ज दाखल केले. यानंतर दुपारी ४ वाजता मतदान प्रक्रिया घेण्यात आली. यात सहकार पॅनलचे राजेंद्र जैन, भैरसिंग नागपूरे, अजय हलमारे यांना प्रत्येकी १४ मते मिळाली. तर परिवर्तन पॅनलचे जितू कटरे, गप्पू गुप्ता, गंगाधर परशुरामकर यांना प्रत्येकी ६ मते मिळाली. त्यामुळे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी माजी आ. राजेंद्र जैन, उपाध्यक्षपदी भैरसिंग नागपूरे व सचिवपदी अजय हलमारे यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी विजयी घोषीत केले. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी सहकार पॅनलचा दणदणीत विजय झाल्यानंतर जिल्हा बँकेच्या परिसरात गुलाल उधळून विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी आ. परिणय फुके, विजय रहांगडाले, राजकुमार बडोले, विनोद अग्रवाल, भाजपा जिल्हा अध्यक्ष सीता रहांगडाले, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले तसेच सहकार पॅनलचे सर्व संचालक उपस्थित होते.
परिवर्तन पॅनलला सुरुंग
जिल्हा बँकेच्या एकूण २० संचालकपदासाठी पार पडलेल्या निवडणुकीत सहकार पॅनलचे ११ आणि परिवर्तन पॅनलचे ९ सदस्य निवडून आले होते. मात्र निवडणुकीनंतर परिवर्तन पॅनलचे पंकज यादव व अजय हलमारे या दोन संचालकांनी सहकार पॅनलला समर्थन जाहीर करीत परिवर्तन पॅनलला धक्का दिला. तर अध्यक्षपदाच्या निवडणुकी दरम्यान परिवर्तन पॅनलचा पुन्हा संचालक फुटल्याने या पॅनलचे संख्याबळ सहावर आले. परिणामी परिवर्तन पॅनलला सुरुंग लागला.
सहकार पॅनलची खेळी यशस्वीजिल्हा बँकेच्या २० संचालकपदासाठी २९ जून राेजी निवडणूक पार पडली. ही निवडणूक प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व भाजपाने एकत्र येत सहकार पॅनल तयार करुन लढविली. निवडणुकीनंतर दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अध्यक्षपदी राजेंद्र जैन हेच
विराजमान होणार असे स्पष्ट केले. यानंतर जिल्हा बँकेतील ताकद आणखी वाढविण्यासाठी परिवर्तन पॅनलचे तीन सदस्य फोडण्याचीसहकार पॅनलची खेळी यशस्वी झाली.
पटोलेंची जादू चालली नाही
गोंदिया जिल्हा बँक निवडणूक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी प्रतिष्ठेची केली होती. तसेच अध्यक्षपदी परिवर्तन पॅनलच्या संचालकाची वर्णी लागावी यासाठी गाठीभेटी भर देऊन मोर्चेबांधणी केली होती. पण या निवडणुकीत पटोलेंची जादू चाललीउलट त्यांच्या पॅनलचे तीन संचालक फुटल्याने सुरंग लागला.
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी सर्वाधिक काळ जैन
जिल्हा बँकेची निवडणूक तब्बल १३ वर्षांनंतर पार पडली. त्यामुळे गेली १३ वर्ष बँकेच्या अध्यक्षपदी माजी आ. राजेंद्र जैन हेच विराजमान होते. त्यानंतर आता सलग दुसऱ्यांदा त्यांची अध्यक्षपदी निवड झाली. त्यामुळे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी सर्वाधिक काळराहण्याचा इतिहास राजेंद्र जैन यांच्या नावावर आहे.